गोळीबार प्रकरणातील सावकारास अटक

प्रफुल्ल भंडारी
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

दौंड - दौंड शहरात जुगार आणि सावकारीच्या पैशांवरुन झालेल्या वादातून तिघांचा गोळ्या झाडून खून करणाऱ्या निलंबित सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय बळीराम शिंदे यास व्याजाने पैसे देणारा खासगी सावकार आनंद अण्णाराव जाधव यास अटक करण्यात आली आहे. संजय शिंदे यास मासिक दहा टक्के व्याजदराने सतरा महिन्यांपूर्वी आनंद याने पैसे दिले होते. 

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने ३१ जानेवारी रोजी दुपारी आनंद अण्णाराव जाधव (वय ४०, रा. गोवा गल्ली, दौंड) यास अटक केली. आनंद जाधव याने मासिक दहा टक्के व्याजाने पंचवीस हजार रुपये दिले होते. संजय शिंदे याने आनंद यास दर महिन्याला दहा टक्के प्रमाणे व्याजाची रक्कम दिली होती. परंतू तीन महिन्याचे व्याज आणि मुद्दल न दिल्याने आनंद जाधव याने त्याच्याकडे तगादा लावला होता. १६ जानेवारी रोजी संजय शिंदे याने शासकीय पिस्तूलातून परशुराम गुरुनाथ पवार (वय ३३), गोपाळ काळुराम शिंदे (वय ३५, दोघे रा. दौंड) व अनिल विलास जाधव (वय ३०, रा. चोरमले वस्ती, ता. दौंड) या तिघांवर भरदिवसा गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर संजय शिंदे याने आनंद जाधव याला मोबाईल कॉल केला होता. परंतू दोघांमधील संभाषणानंतर आनंद याने जीव वाचविण्यासाठी थेट दौंड पोलिस ठाण्याचा आश्रय घेतल्याने तो बचावला गेला. संजय शिंदे याने मोबाईल करुन उसण्या पैशांच्या मुद्द्यावरुन शिवीगाळ करीत धमकी दिली, अशा आशयाची तक्रार आनंद जाधव याने १६ जानेवारी रोजी दौंड पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान संजय बळीराम शिंदे याने आनंद जाधव याच्याविरोधात बेकायदा सावकारी प्रकरणी फिर्याद दिली आहे. दौंड पोलिसांनी फिर्यादीनुसार त्याच्याविरूध्द महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

Web Title: marathi news pune firing police arrested