भाऊच नाही, आता ताईही बाउंसर!

जागृती कुलकर्णी 
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

महिलांनी वेगळ्या वाटेने जात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यासाठी त्या मेहनत घेत आहेत. बाउंसरसारख्या क्षेत्रात देखील आता त्यांनी पाय रोवायला सुरवात केली आहे. यातून त्यांनी स्वत:ला खऱ्या अर्थाने "स्वयंसिद्धा' केले आहे. 
अमिता कदम, संचालिका, स्वामिनी ग्रुप 

धायरी -  बाउंसर म्हंटलं, की डोळ्यासमोर उभे राहतात ते धट्टेकट्टे तरुण. पण इतर क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रातीलही पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढण्याची किमया जनता वसाहतीतील महिलांनी साधली आहे. एरवी धुणीभांडी करून कुटुंबाचा चरितार्थ चालविणाऱ्या या महिलांनी बाउंसरचे प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या हिमतीवर समाजात मानाचे पान मिळविले आहे. सध्या या "स्वामिनीं'चा सर्वत्र बोलबाला सुरू आहे. 

केवळ धुणीभांडी किंवा इतर घरकामे करणाऱ्या महिला अशी ओळख यापूर्वी जनता वसाहतीतील महिलांची होती. मात्र ही ओळख पुसून चाकोरीबाहेरचे जीवन जगण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. जिन्स, काळा टी शर्ट हा त्यांचा गणवेश. गर्दीला आवरणे, महिलांच्या गर्दीचे योग्य नियोजन करणे हे त्यांचे मुख्य काम. या माध्यमातून त्यांचे अर्थार्जन होत आहे. या सोबतच त्यांना आत्मविश्‍वास आणि मानसन्मानदेखील मिळत आहे. 

अमिता कदम यांना सर्वप्रथम ही कल्पना सुचली. त्यांनी स्वामिनी नावाने ग्रुप तयार केला. कदम यांच्या सोबतच आरती भुवड, मीनल राक्षे, शर्मिला धोत्रे, अंजली रहाटे, विशाखा साळुंखे, निशा धोत्रे, दीपाली साळुंखे, रिंकू, रोहिणी या महिला या ग्रुपमध्ये सहभागी झाल्या. बाउंसर असलेले आणि होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले स्वप्नील तारू यांच्याकडून या महिलांनी प्रशिक्षण सुरू केले. गर्दी कशी सांभाळायची, अप्रिय घटना घडत असेल तर त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, सेलेब्रिटी किंवा अन्य खास पाहुणे असतील तर त्यांची गर्दीत काळजी घेऊन सुरक्षा कशी करायची, याचे धडे त्यांनी या महिलांना शिकविले. जिन्स, काळा टी शर्ट हा त्यांचा पेहराव. 

सर्वप्रथम 30 डिसेंबर 2017 रोजी एका पार्टीत त्यांनी बाउंसर म्हणून काम केले. लग्न, स्वागत समारंभ, होममिनिस्टर सारखे महिलांच्या कार्यक्रमांसह अनेक कार्यक्रमात त्यांनी काम केले. वाहतूक कोंडी सोडविण्यातही त्या कमी पडत नाहीत. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते रात्री दोन वाजेपर्यंत त्यांनी काम केले. पबमध्ये येणाऱ्या महिलांना सावरणे आणि गर्दीचे नियोजन करणे, मद्यपान करणाऱ्या महिलांना आवरणे, त्यांना समजवणे अशी अनेक कामे त्यांनी यशस्वीपणे केली. हिंजवडी, भूगाव आदी भागांतील अनेक पबमधे या महिला सध्या बाउंसर म्हणून काम करीत आहेत. 
यापूर्वी केवळ पोळीभाजी असा आहार असणाऱ्या या महिला आता प्रोटीनयुक्त पदार्थ, दूध, फळे असा आहार घेत आहे. या महिला आता बॉम्ब डिटेक्‍ट करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. या सगळ्यात त्यांच्या घरातल्यांची मोलाची साथ मिळत आहेत. सुरवातीस परिसरातून या महिलांना काही प्रमाणात विरोध झाला; पण तो त्यांनी यशस्वीपणे मोडून काम सुरू ठेवले. 

Web Title: marathi news pune lady bouncer