मांजरीतील ग्रामपंचायत निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

नुकतीच मांजरी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली, या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये सुमारे 300 बोगस मतदान ओळखपत्र व बाहेरून मतदान साठी आलेले काही बोगस मतदार पकडण्यात आले होते. त्यांना हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

मांजरी - येथील ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले आहे. त्यातील बोगस ओळखपत्रे व काही बोगस मतदारांना पोलिसांच्या ताब्यात देवूनही कारवाई झालेली नाही. त्याबाबत पोलिसांनी तातडीने लक्ष घालून सूत्रधारास लवकरात लवकर अटक करावी; अन्यथा हडपसर पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांनी दिला आहे. 

सुरेश घुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील यांची हडपसर पोलिस स्टेशनमध्ये भेट घेतली. त्यावेळी झालेल्या गैरप्रकाराबाबत माहिती देत त्या बाबतचे निवेदन दिले. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार, मनसेचे विशाल ढोरे, माजी जिल्हापरिषद सदस्य शिवाजी खलसे, प्रशांत घुले, दिलीप टकले आदी उपस्थित होते.

नुकतीच मांजरी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली, या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये सुमारे 300 बोगस मतदान ओळखपत्र व बाहेरून मतदान साठी आलेले काही बोगस मतदार पकडण्यात आले होते. त्यांना हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, पोलिसांकडून त्याबाबत अद्याप कारवाई करण्यात आली नाही, अशी तक्रार घुले यांनी केली आहे. ते म्हणाले, "बोगस मतदान ही लोकशाहीला मारक असून प्रामाणिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे. मांजरी बुद्रुक येथील निवडणूक पारदर्शक पद्धतीने झाली नाही. पोलिस व प्रशासनाला हाताशी धरून काही अपप्रवृत्तींनी अशाच पध्द्तीने पूर्ण ग्रामपंचायत निवडणुकीत बोगस मतदान घडवून आणल्याचा संशय आहे. गेल्या वर्षीच्या पालिका निवडणूकीतही कोंढव्यात असा प्रकार झाल्याचे उघड झाले होते. त्यासाठी पोलिसांनी गांभीर्याने कारवाई करण्याची गरज आहे.''
 
"बोगस निवडणूक ओळखपत्रे बाबत निवडणूक आयोग व संबंधित कार्यालयाकडे आम्ही अहवाल पाठविणार आहोत,'' असे सहायक पोलिस आयुक्त पाटील यांनी सांगितले. विशाल ढोरे यांच्या तक्रारीचाही तपास करून कारवाई करणार असल्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगितले.

निवडणुकीच्या आदल्या दिवशी माझ्या घरावर व कुटुंबावर हत्यारे घेऊन हल्ला केला, गाड्या फोडल्या, दगडफेक केली. पोलिसांनी अद्याप या गुंडांवर कारवाई केली नाही. हल्लेखोर व त्यामागील मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही मनसेचे विभागप्रमुख विशाल ढोरे यांनी यावेळी केली आहे.

Web Title: marathi news pune manjari grampanchayat fake voting election