‘आधार’पासून बॅंकांच्या पळवाटा बंद

योगिराज प्रभुणे
शुक्रवार, 16 मार्च 2018

आधार नोंदणी मशिन बॅंकांच्या शाखांमधून बसविण्याचा फतवा केंद्र सरकारने काढला खरा, पण त्याला बॅंकांनी सोईस्कर बगल देण्याचा प्रयत्न वारंवार केल्याचे दिसते. परंतु, आधार नोंदणीच्या कामातून सुटका करून घेण्याचे बॅंक कर्मचाऱ्यांचे सर्व मार्ग आता बंद झाले आहेत. 

आधार नोंदणी मशिन बॅंकांच्या शाखांमधून बसविण्याचा फतवा केंद्र सरकारने काढला खरा, पण त्याला बॅंकांनी सोईस्कर बगल देण्याचा प्रयत्न वारंवार केल्याचे दिसते. परंतु, आधार नोंदणीच्या कामातून सुटका करून घेण्याचे बॅंक कर्मचाऱ्यांचे सर्व मार्ग आता बंद झाले आहेत. 

कधी आधार नोंदणी फक्त खातेदारांसाठीच आहे, असे सांगून, तर कधी मशिन बंद आहेत, असे सांगून आधार नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची बोळवण केली जात होती. यावर काही पुणेकर नागरिकांनी थेट जिल्हा प्रशासनाकडे तक्रार अर्ज दाखल केला. त्याची गंभीर दखल घेऊन बॅंकांमधील आधार नोंदणी सामान्यांसाठी खुली केली. परंतु, आधार नोंदणीसाठी बॅंक कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. त्यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बॅंक आणि टपाल कर्मचाऱ्यांना आधार नोंदणीचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे आधारमधून सुटका करून घेण्याचा बॅंक कर्मचाऱ्यांचा अखेरचा मार्गदेखील बंद झाल्याचे दिसून येते. 

सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डची नोंदणी बेमुदत कालावधीपर्यंत वाढविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आधार केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे. मोबाईल फोनच्या सिमकार्डपासून बॅंक, गॅस, प्राप्तिकर विवरण, विम्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड जोडण्याची सक्ती केंद्र सरकारने केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना आधार कार्डची नोंदणी सहजतेने करता यावी, यासाठी बॅंकांमध्येही आधार नोंदणी मशिन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र, या बॅंका फक्त आपल्या खातेदारांचीच नोंदणी करीत असल्याची माहिती पुढे आली. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आधार कार्ड नोंदणीबाबत बॅंक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात हे आदेश देण्यात आले होते.

आधार केंद्र चालविताना तांत्रिक अडथळ्याचे उत्तर बॅंक कर्मचाऱ्यांना देता येणार नसल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले होते. त्यासाठी बॅंकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. शुक्रवारपासून (ता. १६) हे प्रशिक्षण सुरू होणार आहे. 

पुणे जिल्ह्यासाठी केंद्राने १२९ मशिन दिल्या आहेत. त्यापैकी ५७ बॅंकांच्या शाखांनी प्रत्यक्षात आधार कार्ड देण्याची व्यवस्था केली आहे. आधार कार्ड नोंदणीची केंद्रे सर्वांसाठी खुली असल्याचा ठळक फलक बॅंक शाखांच्या बाहेर दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: marathi news pune news aadhar card bank