दोन ट्रकमध्ये अपघात, एक ट्रकचालक गाडीसह फरार

Accident
Accident

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) हद्दीतील खेडेकर मळा परिसरातील ओढ्यातून वाळू घेवून ट्रक अचानक पुणे सोलापूर महामर्गावर आल्याने, महामार्गावरील सोलापूरकडे जुने टायर घेऊन जाणारा ट्रक वाळूच्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातामध्ये टायर वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील एकूण ११ जण जखमी झाले. जखमींपैकी चालक, क्लीनर यांच्यासह दोन प्रवाश्यांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात मंगळवारी (ता. २०) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झाला.

जखमींमध्ये आरुबाई राजू मखरे (वय - ३), रुहीबाई राजू मखरे (वय - २), प्रतिभा राजू मखरे (वय - ३०), पार्वती बाबुराव गायकवाड (चौघे रा. राजवाडा, ता. इंदापूर), पिराजी लक्ष्मण मिसाळ (वय - ४०), स्वाती भागवत मिसाळ (वय - २८), हरीवंदा प्रविण गायकवाड (वय - ५०), सुमन चंद्रगुप्त गायकवाड (वय - २८), संजयकुमार रामचंद्र रगारे (वय - ४५, पाचही रा. बसवकल्याण, ता. हाळी, कर्नाटक), चालक आशिफ शेख (वय - २६, क्लीनर महंमद युसुब (वय - २४, दोघेही रा. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) यांचा समावेश आहे. जखमींपैकी चालक आशिफ शेख, क्लीनर महंमद युसुब यांच्यासह हरीवंदा गायकवाड व स्वाती मिसाळ यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर वाळू वाहतूक करणारा ट्रकचालक गाडीसह फरार झाला.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडेकर मळ्यातील ओढ्यात मागील काही दिवसांपासून वाळूचे ट्रक नेवून वाळू धुतली जाते. असाच एक वाळू धुतलेला ट्रक पहाटे चार वाजण्याच्या सुमारास महामार्गावर आला. त्याचवेळी मुंबईहून सोलापूरकडे जुन्या टायरची वाहतूक करणारा ट्रक ओढ्यातून अचानक आलेल्या ट्रकवर जावून आदळला. हा अपघात इतका भीषण होता कि, टायरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची केबिन पूर्णपणे चेपली गेली. या केबिनमध्ये मुंबईहून इंदापूर व कर्नाटक येथे जाण्यासाठी निघालेले नऊ प्रवासी व ट्रकचे चालक व क्लीनर अडकले. 

अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी प्रतिष्ठानचे मिलिंद मेमाणे, किशोर मेमाणे, वैजनाथ कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी तातडीने केबिनमध्ये अडकलेल्या जखमींच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. ट्रकची केबिन पूर्णपणे चेपली गेल्याने जखमींना बाहेर काढणे शक्य होत नसल्याचे पाहून मिलिंद मेमाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्रॅक्टरला दोर बांधून केबिन ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले व त्यांचे सहकारी सचिन पवार, अमोल भोसले यांनी पुढे होवून जखमींना केबिनच्या बाहेर काढले व तातडीने कस्तुरी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून लोणी काळभोर (ता. हावेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघातातील जखमींपैकी आशिफ शेख, क्लीनर महंमद युसुब यांच्यासह हरीवंदा गायकवाड व स्वाती मिसाळ यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक डॉ. आशिषकुमार दोषी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com