पुणे: ससाणेनगर येथे भुयारी मार्गासाठी आंदोलन

संदीप जगदाळे
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

ससाणेनगर-सय्यदनगर येथील रेल्वे क्रॉसिंग वाहतूककोंडीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने येथील रेल्वे गेटवर आंदोलन करण्यात आले, यावेळी चेतन तुपे बोलत होते. यावेळी आंदोलकांनी आक्रमकपणे भूमिका मांडून सत्ताधारी भाजप व आमदारांचे वाभाडे काढले.

हडपसर : ससाणेनगर येथील रेल्वे फाटकावरील भुयारी मार्गाचे काम मंजूर झाले असताना केवळ भाजपच्या हट्टापायी आणी राजकीय आसूयेपायी काम रखडले आहे. या कामाची निविदा मुदत संपल्याने रद्द झाली आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांनी केला. 

ससाणेनगर-सय्यदनगर येथील रेल्वे क्रॉसिंग वाहतूककोंडीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने येथील रेल्वे गेटवर आंदोलन करण्यात आले, यावेळी चेतन तुपे बोलत होते. यावेळी आंदोलकांनी आक्रमकपणे भूमिका मांडून सत्ताधारी भाजप व आमदारांचे वाभाडे काढले.

याप्रसंगी हडपसर-मुढवा प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका नंदा लोणकर, रुकसाना इनामदार, माजी नगरसेवक फारूक इनामदार, सुनील बनकर, डॅा. शंतनू जगदाळे, भानुदास शिंदे, प्रवीण ताथोड, कलेश्वर घुले, सागरराजे भोसले, प्रणय भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इनामदार म्हणाले, अजित पवार यांच्या हस्ते भुयारी मार्गाचे भूमिपूजन केले. आमदारांनी ३६ फूट गेट ४० लाख खर्च करून अरुंद केले. भ्रष्टाचारी आमदाराने जनतेच्या पैसाचा अपव्यय केला आहे. 

ससाणे म्हणाले, पालकमंत्री गिरीष बापट व आमदार योगेश टिळेकर यांनी काम बंद पाडले. नागरिकांना वाहतूककोंडी त्रास सहन करावा लागतो. थापा मारणारे महापौर व स्थानिक आमदार यांनी निधी न दिल्याने काम झाले नाही. कचरा प्रकल्पाच्या बाजूने भाजप, शिवसेना व काँग्रेसने मतदान करून रामटेकडी येथील कचरा प्रकल्प मंजूर केला, राष्ट्रवादी ने विरोध केला. शिवसेना व काँग्रेसने दुटप्पी भूमिका घेतली. त्यामुळे हडपसरवासीय या पक्षांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. 

वैशाली बनकर म्हणाल्या, ४० कोटी रुपये निधीची तरतूद करून भुयारी मार्गाचे काम सुरू केले होते. पण भाजप सत्ताधाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे काम बंद पडले आणि येथील वाहतुककोंडीचा प्रश्न भिजत पडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news Pune news agitation in Hadapsar