महापालिकेमुळेच रखडले धावपट्टीचे विस्तारीकरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पुणे - लोहगाव विमानतळ धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम हवाई दलामुळे नव्हे, तर महापालिकेच्या दिरंगाईमुळे रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यात तातडीने लक्ष घालून विमान प्रवाशांची गैरसोय दूर करावी, असे आवाहन हवाई वाहतूक विश्‍लेषक धैर्यशील वंडेकर यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री गिरीश बापट यांना सोमवारी केले. 

पुणे - लोहगाव विमानतळ धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम हवाई दलामुळे नव्हे, तर महापालिकेच्या दिरंगाईमुळे रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यात तातडीने लक्ष घालून विमान प्रवाशांची गैरसोय दूर करावी, असे आवाहन हवाई वाहतूक विश्‍लेषक धैर्यशील वंडेकर यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री गिरीश बापट यांना सोमवारी केले. 

लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण गेल्या दहा वर्षांपासून रखडले आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय तसेच लांब पल्ल्याच्या विमानांचे उड्डाण होण्यावर मर्यादा आल्या आहेत. धावपट्टीचे विस्तारीकरण तातडीने करण्याची मागणी अनेक विमान कंपन्यांनी वारंवार केली असून, याला हवाई दलानेही अनुकूल प्रतिसाद दिला आहे. 

पुणे विमानतळ सल्लागार समितीमध्ये केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि पालकमंत्री यांनाही समाविष्ट करावे, त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगाने पार पडू शकते, असेही त्यात म्हटले आहे. पुणे विमानतळावरून दररोज 160 विमानांचे उड्डाण होते आणि सुमारे 20 हजारांहून अधिक प्रवाशांची वाहतूक होते. धावपट्टीचे विस्तारीकरण झाल्यास ही संख्या वाढण्याची दाट शक्‍यता असल्याचेही वंडेकर यांनी म्हटले आहे. 

भूसंपादनाअभावी पर्यायी रस्ता नाही 
विमानतळाचे विस्तारीकरण पूर्वेच्या बाजूने होणार आहे, त्यासाठी लोहगाव- येरवडा रस्ता बंद करावा लागणार असल्याने पर्यायी रस्ता उपलब्ध करावा लागणार आहे. त्यासाठीची तरतूदही आहे. परंतु महापालिकेने भूसंपादन करून रस्ता निर्माण केला पाहिजे. याबाबत प्रशासनाकडून दिरंगाई होत असून, तरतूद केलेल्या रस्त्यालगत नागरीकरण वाढत आहे. हा पर्यायी रस्ता रखडल्यास भविष्यात धावपट्टीचे विस्तारीकरण करताच येणार नाही. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे वंडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

3300 फुटांचे विस्तारीकरण हवे 
लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीची लांबी सुमारे 8 हजार 350 फूट आहे. आंतरराष्ट्रीय व लांब पल्ल्याच्या विमानांसाठी धावपट्टीचे आणखी 3 हजार 300 फुटांचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबतचा प्रस्ताव गेल्या दहा वर्षांपासून रखडला असून, लोकप्रतिनिधींनी आता तरी या प्रश्‍नात लक्ष घालावे, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: marathi news pune news airport