'केमिस्ट्री'चा बोनस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत चुका झाल्याची बाब समोर आली आहे. प्रश्‍नपत्रिकेच्या छपाईमध्ये चुका झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यासंदर्भातील अहवाल मागविण्यात आला. दोन प्रश्‍नांमध्ये किरकोळ चुका झाल्या असल्या तरी हे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सात गुण देण्यात येतील, असा निर्णय शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केला.

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत चुका झाल्याची बाब समोर आली आहे. प्रश्‍नपत्रिकेच्या छपाईमध्ये चुका झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यासंदर्भातील अहवाल मागविण्यात आला. दोन प्रश्‍नांमध्ये किरकोळ चुका झाल्या असल्या तरी हे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सात गुण देण्यात येतील, असा निर्णय शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केला.

दोन प्रश्‍नांमध्ये चुका
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या विज्ञान शाखेतून राज्यातील पाच लाख ८० हजार ८२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांचा २८ फेब्रुवारीला रसायनशास्त्राचा पेपर झाला. याच कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन सुरू होते. त्यामुळे रसायनशास्त्राचा पेपर झाल्यानंतर लगेचच होणारी या विषयाशी संबंधितांची बैठक झाली नाही. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बहिष्कार आंदोलन मागे घेतले. त्यानंतर पेपर तपासणीसाठी पाठविण्यापूर्वी विषयानुसार होणाऱ्या बैठका सुरू झाल्या. रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत प्रिटिंगच्या काही चुका झाल्याचे निदर्शनास आले. प्रश्‍नपत्रिकेत दोन किरकोळ चुका असल्याचे त्यातून समजले.

तीन वर्षांत दोनदा गोंधळ
तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रश्‍नपत्रिका तयार करूनही अशा चुका राहतातच कशा, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या चुकांमुळे आता नाइलाजाने राज्य शिक्षण मंडळाला विद्यार्थ्यांना सात गुण द्यावे लागणार आहेत. बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरसंदर्भात दरवेळी काही-ना-काही घडत असल्याचे समोर येत आहे. गेल्या दोन वर्षांत रसायनशास्त्राच्या प्रश्‍नपत्रिकेत अशाच चुका झाल्या होत्या, तर एकदा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला होता. 

बारावीच्या रसायनशास्त्राच्या प्रश्‍नपत्रिकेत प्रिटिंगच्या चुका झाल्याचे दिसून आले आहे. या किरकोळ चुकांमुळे विद्यार्थ्यांना सात गुण द्यावे लागतील, असे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. संबंधित विषयाच्या अभ्यास मंडळाशी याबाबत शहानिशा करण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांना सात गुण देण्याचा निर्णय  घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे, अशाच विद्यार्थ्यांना हे गुण दिले जातील. तसेच दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- डॉ. शकुतला काळे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

प्रश्‍नपत्रिका तयार होताना संबंधित विषयाच्या तज्ज्ञ शिक्षकांकडून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रश्‍नपत्रिकेची सॉफ्टकॉपी घ्यावी. असे केल्यास प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍न संगणकावर टाईप करताना होणाऱ्या चुका टाळता येतील. शिक्षकांकडून छापील संगणकीय प्रत घ्यावी.’’
- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

रसायनशास्त्राचा पेपर खूप अवघड होता. काही प्रश्‍न कळालेच नाहीत. प्रश्‍नांचे उत्तर लिहितांना गोंधळ उडाला. तरीदेखील ते प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. 
- सुमीत महारुगडे, विद्यार्थी

Web Title: marathi news pune news chemistry paper bonus hsc exam