महिला दिनी दौंड-बारामती रेल्वे पॅसेंजरची सूत्रे महिलांकडे

प्रफुल्ल भंडारी
गुरुवार, 8 मार्च 2018

दौंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीन वर आज (ता. ८) सकाळी पुणे - दौंड - बारामती (गाडी क्रमांक ५१४५१) ही पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेनुसार ८ वाजून ५० मिनिटांनी दाखल झाली. पुणे ते दौंड दरम्यान पॅसेंजरचे चालक पुरूष होते व दौंड ते बारामती या ४३ किलोमीटर अंतराच्या लोहमार्गावर या पॅसेंजरचे सारथ्य केले महिला चालक अनिता राज यांनी व त्यांना सहायक चालक होत्या अभिलाषा प्रजापती.

दौंड : मध्य रेल्वे प्रशासनाने जागतिक महिला दिनी दौंड - बारामती पॅसेंजरची सूत्रे महिलांकडे देऊन त्यांना विशेष सन्मान केला आहे. पॅसेंजरची सूत्रे पूर्णतः स्वीकारणार्या या महिलांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीन वर आज (ता. ८) सकाळी पुणे - दौंड - बारामती (गाडी क्रमांक ५१४५१) ही पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेनुसार ८ वाजून ५० मिनिटांनी दाखल झाली. पुणे ते दौंड दरम्यान पॅसेंजरचे चालक पुरूष होते व दौंड ते बारामती या ४३ किलोमीटर अंतराच्या लोहमार्गावर या पॅसेंजरचे सारथ्य केले महिला चालक अनिता राज यांनी व त्यांना सहायक चालक होत्या अभिलाषा प्रजापती. पॅसेंजरचे गार्ड म्हणून जबाबदारी होती वैशाली रमेश भोसले यांच्याकडे. पॅाइंटसमन होत्या हर्षा सुदाम अमृते. पॅसेंजर मध्ये महिला तिकीट तपासनीसांची नेमणूक करण्यात आली होती. काही महिला कर्मचार्यांनी अनिता राज व अभिलाषा प्रजापती यांना कुंकू लावत सदिच्छा दिल्या. नियमाप्रमाणे तांत्रिक बाबींची पूर्तता करीत सहकार्यांकडून पॅसेंजरची सूत्रे स्वीकारल्यानंतर अनिता राज यांनी डिझेल इंजिनला हॅार्न दिला. डिझेल इंजिनसमोर नारळ वाढविल्यानंतर आणि रेल्वे स्थानक व्यवस्थापिका तनुजा अनुप डाके यांनी पॅसेंजरला ८ वाजून ५५ मिनिटांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट करण्यासह ` नारी शक्ती झिंदाबाद ` अशा घोषणा देण्यात आल्या. सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून झालेला सत्कार आणि कौतुकामुळे अनिता राज, अभिलाषा प्रजापती व वैशाली भोसले भारावून गेल्या होत्या व त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. 

महिला दिनानिमित्त रेल्वे स्थानकाच्या महिला अधिकारी व कर्मचारी यांचा वाहतूक नियंत्रक आर. बी. सिंग, स्थानक व्यवस्थापक पी. के. शुक्ला, रेल्वेचे कार्य निरीक्षक सुमंत कुमार, नगरसेवक जीवराज पवार, सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे पदाधिकारी, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे पदाधिकारी, आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिशू विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका पद्मिनी अनंतकवळस यांनी अनिता राज, अभिलाषा प्रजापती व वैशाली भोसले यांचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार केला. महिला अधिकारी व कर्मचार्यांना फुलांचा हार व गुलाबाची फूले देण्याबरोबर हा सोहळा साजरा करताना पेढे वाटण्यात आले. रेल्वेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Marathi news Pune news Daund womens day celebration