भाजप सरपंचाचा मद्यधुंद अवस्थेत भरदिवसा राडा

संतोष आटोळे 
शनिवार, 3 मार्च 2018

शिर्सुफळ (पुणे) : मद्यधुंद अवस्थेतील सरपंच व त्याच्या साथीदारांनी चक्क एका कारच्या काचा फोडून 17 हजार रुपये लंपास केल्याची घटना बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे घडली. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान सरपंच अतुल हिवरकर याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भाजपचे काम करणार्‍या या सरपंचाने शुक्रवारी गावातच राडा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिल बापूराव धवडे (रा.शिर्सुफळ, ता. बारामती) हा युवक शुक्रवारी (ता.02) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आपली टाटा नेक्सोन (क्र. एमएच 42 एएस 4348) ही कार घेऊन गावात आठवडे बाजार असल्याने भाजीपाला आणण्यासाठी गेला होता. त्याने आपली कार शिरसाई देवी मंदिराच्या परिसरात लावलेली होती. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेतील सरपंच अतुल हिवरकर, त्याचे साथीदार भारत हिवरकर व संजीव बोराटे यांनी या कारच्या काचा फोडल्या. यामध्ये ठेवलेली 17 हजार 300 रुपये रोख लांबवून या तिघांनीही पोबारा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

याबाबत अनिल धवडे याने बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी भादंवि कलम 392, 34, 427  नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याबाबत पोलिसांनी रात्री शिर्सुफळमध्ये जाऊन आरोपींचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नसल्याचे पोलीस निरीक्षक सुरेशासिंह गौड व बिट अंमलदार मारुती हिरवे यांनी सांगितले.पुढील तपास मारुती हिरवे करीत आहेत.

याबाबत सरपंच अतुल हिवरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अनिल धवडे याला आपण दोन महिन्यांपूर्वी दोन लाख रुपये हात उसने दिले होते. वारंवार मागणी करुनही तो देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. याच दरम्यान तो काल शिर्सुफळ येथे आढळून  आला.यावेळी मात्र पैसे न देता त्याने हा खोटा गुन्हा दाखल केला असुन याला राजकिय रंग असल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Marathi news pune news drunk bjp sarpanch baramati