आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून 11 जणांवर गुन्हा 

प्रफुल्ल भंडारी
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

दौंड (पुणे) : दौंड शहरातील मदरसा व मशिदीसंबंधी माहिती अधिकारातून माहिती मागवून चुकीच्या गोष्टींविषयी संबंधितांकडे तक्रार करणाऱ्या निसार शेख या तरूणास त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वसीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, मशिदीचे मौलाना यांच्यासह एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती अधिकारात मागविल्याने आणि संबंधितांकडे तक्रार केल्याने अकरा जणांनी त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दौंड (पुणे) : दौंड शहरातील मदरसा व मशिदीसंबंधी माहिती अधिकारातून माहिती मागवून चुकीच्या गोष्टींविषयी संबंधितांकडे तक्रार करणाऱ्या निसार शेख या तरूणास त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वसीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोहेल खान, मशिदीचे मौलाना यांच्यासह एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती अधिकारात मागविल्याने आणि संबंधितांकडे तक्रार केल्याने अकरा जणांनी त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी आज (ता. २) या बाबत माहिती दिली. निसार जब्बार शेख (वय ४६, रा. कुंभार गल्ली, दौंड) यांनी १ फेब्रुवारी रोजी दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांची पत्नी शन्नो निसार शेख यांनी या बाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार हाजी ताहेर खान हाजी युसूफ खान, हाजी सोहेल खान हाजी नासीर खान, हाजी शफीउल्लाह खान हाजी अहमद खान (पठाण), फिरोज शफीउल्लाह खान (पठाण), मौलाना अब्दूल रशीद रज्जाक, ईस्माईल इब्राहिम शेख, वसीम ईस्माईल शेख, शेख दस्तगीर हाजी कादर शेख, उबेद बाबूमियां खान, तजमूल काझी (टी.के.) व अखलाख रहिम खान (सर्व रा. दौंड) यांच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार दौंड शहरातील दौंड - गोपाळवाडी रस्ता व लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत इमदादुल उलूम युसुफिया या एकाच नावाने दोन मदरसा सुरू असून त्याच जागेत मदरसा इमदादुल उलूम युसुफिया माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. अंजुमन-ए-इब्राहिम बिस्मिल्लाह ट्रस्ट व कुबरा मस्जिद (खाजा वस्ती) याच पत्त्यावर कागदोपत्री दाखविण्यात आल्या आहेत परंतु प्रत्यक्षात हे काही ट्रस्टींचे निवासस्थान असल्याने निसार जब्बार शेख यांनी माहिती अधिकारात या सर्व संस्थांची माहिती मागविली होती.

माहिती अधिकारात आवश्यक माहिती देण्यात आली नाही व जी माहिती देण्यात आली त्यानुसार अंजुमन-ए-इब्राहिम बिस्मिल्लाह ट्रस्ट व कुबरा मस्जिद संबंधी खोटी व बनावट असल्याचा निसार शेख यांचा दावा होता. माहिती अधिकारात माहिती मागितल्याने अकरा जणांनी निसार शेख यांना फार त्रास देत दादागिरी केली होत. सदर त्रासाबद्दल निसार शेख यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती व त्याची चौकशी सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मदरसा आणि मशिदीच्या वर्चस्वावरील वादाची सुनावणी वक्फ बोर्ड, धर्मादाय आयुक्त व संबंधित न्यायालयात सुरू असून न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक झाल्याशिवाय शवविच्छेदन आणि मृतदेहाचे दफन न करण्याची भूमिका काही नातेवाईकांनी घेतल्याने आज (ता. २) सायंकाळी पाच वाजेपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी संबंधितांना गुन्हा दाखल झाल्याने अटक होणार असल्याचे समजावून सांगितले परंतु काही नातेवाईक अटकेवर ठाम राहिल्याने शवविच्छेदन झालेले नाही. सदर संशयित अकरा आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने खळबळ...
आत्महत्येपूर्वी निसार शेख याने घरात चिठ्ठी लिहून ठेवल्याचे आणि आत्महत्येपूर्वी स्वतःचे व्हिडिओ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. निसार शेख याने आत्महत्या मागील कारणे आणि संशयित आरोपींचा नामोल्लेख करणारा स्वतः चा एक व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ ठराविक मित्र, पोलिस अधिकारी आणि नातेवाईकांना पाठविला होता. या व्हिडिओ मुळे खळबळ उडाली आहे.

Web Title: Marathi news pune news encourage to suicide