पुणे : कर्वेनगर चौकातील उड्डाण पूल वाहतुकीस खुला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

पुणे : पुणे शहराचा विकास झपाट्याने होत असून, महत्त्वाचे मात्र प्रलंबित प्रकल्प मार्गी लागत आहेत. पुणेकरांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून विकासाची प्रक्रिया राबवीत आहोत, असे सांगत विकासकामांत विरोधकांनीही राजकारण करू नये, असा सल्ला पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिला. पुणेकरांचे जीवनमान उंचविण्यासाठी नवनव्या योजना आणून त्या पूर्ण करीत असल्याचेही बापट यांनी सांगितले. 

पुणे : पुणे शहराचा विकास झपाट्याने होत असून, महत्त्वाचे मात्र प्रलंबित प्रकल्प मार्गी लागत आहेत. पुणेकरांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून विकासाची प्रक्रिया राबवीत आहोत, असे सांगत विकासकामांत विरोधकांनीही राजकारण करू नये, असा सल्ला पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिला. पुणेकरांचे जीवनमान उंचविण्यासाठी नवनव्या योजना आणून त्या पूर्ण करीत असल्याचेही बापट यांनी सांगितले. 

कर्वेनगर चौकातील उड्डाण पुलाचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेवक राजेश बराटे, सुशील मेंगडे, नगरसेविका वृषाली चौधरी आदी या वेळी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ''नव्या उड्डाण पुलामुळे कर्वेनगर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होईल. या पुलाचे काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे ते पूर्ण झाले. गेल्या काही वर्षांत रखडलेले बहुतांशी प्रकल्प सुरू झाले असून, विकास आराखडा (डीपी) मेट्रो, नदीसुधार (जायका), समान पाणीपुरवठा योजना आणि शिवसृष्टीचा समावेश आहे. कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे या भागातील महत्त्वाचा प्रश्‍न सुटणार आहे. अशा योजनांमुळे शहराच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. त्यात महापालिकेसह राज्य आणि केंद्र सरकारांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातून विकासकामांना वेग आला आहे. परंतु, श्रेय घेण्यासाठी राजकारण करणे योग्य नसून, कामांना महत्त्व दिले पाहिजे.'' 

शिवसृष्टी हा महत्त्वाचा विषय असून, त्यासाठी चांदणी चौकातील जागा ताब्यात घेताना येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील. शिवसृष्टीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे बापट यांनी सांगितले. 

महापौर टिळक म्हणाल्या, ''निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या योजनांना आमचे प्राधान्य राहिले आहे. वाहतूक, पाणी, कचरा आणि आरोग्य या बाबींना महत्त्व देऊन विकासकामे करीत आहोत. त्याची परिणामकारकता वाढत असून, उड्डाण पूल आणि रस्त्यांचीही कामे पूर्ण करीत आहोत. ज्यामुळे वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल.'' बराटे, मेंगडे यांचीही भाषणे या वेळी झाली. 

दरम्यान, कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर नावांचा उल्लेख नसल्याने विरोधी पक्षाचे नगरसेवक उपस्थित राहिले नाहीत.

Web Title: marathi news pune news Karve Road Flyover