खडकी कॅंटोन्मेंटला निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा - मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

खडकी - 'खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड हे संरक्षण खात्याच्या अखत्यारित येत असल्यामुळे या भागाचा विकास होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी बोर्डाला केंद्र सरकारकडून योग्य तो निधी मिळत असेल असा माझा समज होता, मात्र बोर्डाला मिळणारा निधी हा अत्यंत अल्प असून तो मिळावा, यासाठी आपण केंद्राकडे पाठपुरावा करून निधीची तरतूद करू,'' असे आश्‍वासन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

बोर्डाच्या आंबेडकर रुग्णालयांतर्गत साप्रस (पूर्व) येथे नवीन रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन आज (ता. 1) मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार विजय काळे, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रधान निदेशक एल. के. पेगु, निदेशक अजय शर्मा, संजीव कुमार, बोर्डाचे अध्यक्ष धीरज मोहन, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, उपाध्यक्ष अभय सावंत, तसेच वॉर्डचे लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी या नवीन रुग्णालयाची संकल्पना चांगली असून, यामध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच येथील सर्वांगीण विकासासाठी मदत करणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

एलबीटी करप्रणाली बंद झाल्यामुळे बोर्डाच्या उत्पन्नात घट झाली, तसेच मिळणारा निधी कमी पडत असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष धीरज मोहन यांनी या वेळी सांगितले. येथे नागरी वसाहत सैन्यापेक्षा अधिक असल्याने मिळणाऱ्या निधीचा बराचसा भाग बोर्डासाठी खर्च केला जातो. "स्मार्ट सिटी' करताना खडकीकडेही सरकारने लक्ष द्यावे, असेही मोहन म्हणाले. तर पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिकांना जोडणारे खडकी शहर असल्याने केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकांप्रमाणे निधी उपलब्ध झाल्यास खडकी कॅन्टोंन्मेंटचा कायापालट होईल, असे अभय सावंत या वेळी म्हणाले.

Web Title: marathi news pune news khadki cantonment fund central government sudhir mungantiwar