खेड तालुक्‍यामध्ये "महालाभार्थी' विशेष अभियान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

मुख्यमंत्री कार्यालयाने "एमकेसीएल' अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या सहकार्याने हे अनोखे वेबपोर्टल विकसित केलेले आहे. भामा आसखेड प्रकल्पग्रस्त निवारण शिबिरादरम्यान आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते या अभियानाची सुरवात केली गेली. येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान खेड तालुक्‍यामध्ये चालविले जाणार आहे.

राजगुरुनगर : केंद्र आणि राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या अडीचशेहून अधिक शासकीय योजनांसाठी नागरिकांची व्यक्तिअनुरूप पात्रता पडताळून देणाऱ्या "महालाभार्थी' या वेबपोर्टलचे राज्यातील पहिले पथदर्शी विशेष अभियान खेड तालुक्‍यासाठी सुरू झाल्याची माहिती खेडचे सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. या वेबपोर्टलमुळे वैयक्तिक लाभार्थी स्वतःच स्वतःची माहिती भरून लाभासाठी पात्र ठरणार असल्याने त्याची ससेहोलपट थांबणार आहे. खेडमध्ये हे अभियान यशस्वी झाले की ते इतरत्रही सुरू केले जाऊ शकेल. 

मुख्यमंत्री कार्यालयाने "एमकेसीएल' अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या सहकार्याने हे अनोखे वेबपोर्टल विकसित केलेले आहे. भामा आसखेड प्रकल्पग्रस्त निवारण शिबिरादरम्यान आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते या अभियानाची सुरवात केली गेली. येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान खेड तालुक्‍यामध्ये चालविले जाणार आहे. महालाभार्थी वेबपोर्टलमधून पुढे येणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अभियानाच्या काळात विशेष सहकार्य केले जाईल, असे आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. उद्‌घाटनप्रसंगी काही नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या विशेष पत्राचे वाटप केले गेले. 

महालाभार्थी वेबपोर्टलसाठी www.mahalabharthi.in या संकेतस्थळाला भेट देऊन नागरिक या सेवेचा लाभ घेऊ शकतील. या संकेतस्थळावर नागरिकांना नोंदणी करून आपला "लॉगीन आयडी' आणि "पासवर्ड' तयार करावा लागेल. या पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे, लाभार्थ्याला कशाची गरज आहे आणि लाभार्थी कोण आहे, हे या पोर्टलला सांगितले की, पोर्टल त्यानुसार त्याला कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकेल, त्याची माहिती देते. त्या योजनांसाठी नागरिकांना आपली संभाव्य पात्रता पडताळून पाहण्यासाठी गरजेनुसार मोजकी माहिती भरावी लागते. पात्र योजनांची यादी, त्यामध्ये मिळू शकणारे लाभ, त्यासाठी अर्ज कुणाला करायचा आणि सोबत जाताना काय कागदपत्रे घेऊन जायची, याची संक्षिप्त माहिती पोर्टल एका प्रिंटच्या माध्यमातून आपल्याला देतो. 

या प्रिंटमध्ये संबंधित नागरिकाच्या नावाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छापील स्वाक्षरीचे एक पत्र अंतर्भूत केलेले आहे. योजनांचे अंतिम लाभार्थी ठरवताना संबंधित शासकीय विभागांतील अधिकारी वर्गाच्या विशेष सहकार्याची हमी यामध्ये दिलेली आहे. पात्र ठरू शकणाऱ्या योजनांच्या उपलब्धतेनुसार विहीत नमुन्यातील अर्ज आणि शासकीय निर्णय अर्थात जीआरसुद्धा वेबपोर्टलवरून 'डाऊनलोड' करायची सोय आहे. या अभियानासाठी खेडचे तहसीलदार विठ्ठल जोशी आणि नायब तहसीलदार राजेंद्र जाधव हे परिश्रम घेत आहेत. नागरिकांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि गरजू व्यक्तींनाही त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

सेवा पूर्णपणे मोफत 

या वेबपोर्टलची सेवा पूर्णपणे मोफत आहे. संगणक किंवा स्मार्टफोन मोबाईल साक्षर नसलेले नागरिक याकामी जवळच्या "एमकेसीएल MS-CIT' केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र (महा-ई सेवा केंद्र) यांची मदत घेऊ शकतात. मात्र, अशी मदत करताना संबंधित केंद्र नागरिकांकडून जास्तीत जास्त 79 रुपयांपर्यंत सेवाशुल्क आकारू शकते. यामध्ये सदर केंद्रांनी सेवा म्हणून नागरिकांना महालाभार्थी वेबपोर्टलवर नोंदणी, लॉगीन आणि माहिती भरून देण्यास मदत करणे आणि मुख्यमंत्री यांचे पत्र डाऊनलोड करून देणे अपेक्षित आहे. 

 

Web Title: Marathi News Pune News Khed News Mahalabharthi Mission