कोथरुडकरांचे जीवनमान उंचावणार : मोहोळ 

कोथरुडकरांचे जीवनमान उंचावणार : मोहोळ 

पुणे : कोथरुडमधील राहिवाशांना भेडसाविणाऱ्या वाहतूक समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात, प्रामुख्याने कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकातील (नळ स्टॉप) दुमजली उड्डाण पूल, करिश्‍मा चौक ते कर्वे पुतळा येथील उड्डाण पुलाबरोबरच विकास आराखड्यातील (डीपी) रस्ते, रस्त्यांचे रुंदीकरण आणि वर्दळीच्या रस्त्यावरील भुयारी मार्गांचे विस्तारीकरण करून पादचारी आणि वाहनचालकांसाठी सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक पुरविण्यात येईल, असा संकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी नव्या वर्षानिमित्त केला आहे. वाहतुकीबरोबर नागरिकांना अन्य दर्जेदार सेवासुविधा देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न करणार, असेही ते म्हणाले. 

विशेष म्हणजे, या उपाययोजनांची प्राथमिक आखणी करण्यात आली असून, त्यांची कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. बालभारती ते पौड रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल. त्याकरिता महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद आहे. कोथरुड आणि सिंहगड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी सनसिटी ते कर्वेनगरपर्यंत (नदीवरून) पूल उभारला जाणार असून, त्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे. अन्य कामांसाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध केला जाईल. ज्यामुळे ही कामे रखडणार नाहीत, याकडेही लक्ष्य देणार असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे. 

कोथरुड आणि आजूबाजूच्या परिसरातील वाढलेली नागरी वस्ती लक्षात घेऊन विकासाच्या योजना आखण्यात आल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता या सेवा-सुविधांसह, ज्येष्ठ नागरिक विशेषत: महिलांच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या घटकांसाठी ज्येष्ठ नागरिक भवन, विरंगुळा केंद्र आणि योगा केंद्रांची उभारणीला प्राधान्य राहणार आहे. डहाणूकर कॉलनी नियोजित (कै.) बाळासाहेब ठाकरे उद्यान आणि (कै.) मंगेश तेंडुलकर यांच्या नावाने करण्यात येणाऱ्या कलादालनासाठी तरतूद आहे. चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, त्याकरिताची भूसंपादन प्रक्रिया आणि अन्य कामांसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद आहे, असेही मोहोळ यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ""या भागातील सोसायट्यांबरोबरच झोपडपट्टीतील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न आहे. त्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य आहे. आवश्‍यकतेनुसार नव्या सांडपाणी वाहिन्या, जलवाहिन्या टाकण्यात येतात. घनकचरा व व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक चांगली करण्याच्या उद्देशाने निरनिराळे प्रयोग राबविले आहेत. त्यात, नव्याने काही प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्सालय कोथरुड साकारण्याचा मानस आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com