दौंड: मॅरेथॅान स्पर्धेत कय्युम शेख, ज्योती गौते विजेते

प्रफुल्ल भंडारी
रविवार, 7 जानेवारी 2018

खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला स्पर्धकांशी हस्तांदोलन केले. रोटरी क्लब आॅफ दौंड, माळवाडी (ता. दौंड) येथील भाऊसाहेब भागवत विद्यालय, रोटरी क्लब आॅफ कुरकुंभ एमआयडीसी व दौंड मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   

दौंड : दौंड शहरात रोटरी क्लबच्या पुढाकाराने आयोजित दौंड रायझिंग या मॅरेथॅान स्पर्धेत वालचंदनगर येथील कय्यूम शेख (१ तास ९ मिनिट) पुरूषांच्या गटात तर परभणी येथील ज्योती गौते (१ तास २१ मिनिट ) यांनी महिलांच्या गटात पहिला क्रमांक पटकावण्यासह प्रत्येकी एकवीस हजार रूपयांचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत एकूण ११७६५ स्पर्धक धावले व त्यामध्ये दौंड शहर व तालुक्यासह मुंबई, पुणे,कोल्हापूर, सातारा, ठाणे, परभणी, नगर, आदी ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते.

शहरात आज (ता. ७) सकाळी या मॅरेथॅान स्पर्धेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सभापती मीना धायगुडे, नगराध्यक्षा शीतल कटारिया, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादी महिला कॅंाग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या हस्ते विविध गटातील स्पर्धांना झेंडा दाखविण्यात आला. राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक श्रीकांत पाठक, दौंड मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॅा. राजेश दाते, सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश भागवत, रोटरी क्लबचे अध्यक्ष हरेश रांभिया, कुरकुंभ क्लबचे अध्यक्ष विनायक काळे, आदी या वेळी उपस्थित होते. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला स्पर्धकांशी हस्तांदोलन केले. रोटरी क्लब आॅफ दौंड, माळवाडी (ता. दौंड) येथील भाऊसाहेब भागवत विद्यालय, रोटरी क्लब आॅफ कुरकुंभ एमआयडीसी व दौंड मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   

स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष होते व यंदाचे ब्रीदवाक्य `आरोग्यासाठी धावा` असे होते. 
               
स्पर्धेचा निकाल (गुणानुक्रमे पहिले तीन क्रमांक)  : -
*१६ वर्षापुढील गट  :  - 
मुले  - तेजस पवार, वज्या पाडवी, आकाश परदेशी. 
मुली  -  ज्योती चव्हाण, भक्ती पाटील, शीतल भगत.  

*मॅरेथॅान २१ किलोमीटर : - 
पुरूष - कय्युम शेख, वैभव जोगदंड, बबन चव्हाण 
महिला - ज्योती गौते, परिमाला बाबर, प्रियांका गाढवे - मेरगळ.

*ज्येष्ठ नागरिक गट : - 
पुरूष - महेंद्र बाजारे, हरिश्चंद्र थोरात, राजाराम खाडे.
महिला - उषा पाटील, हिराबाई आवारी, लिलावती ननवरे. 

क्रीडा शिक्षक जे. एन. आवारी यांच्यासह संयोजन व समन्वयाची जबाबदारी पार पाडली. राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक पाच व सात, दौंड पोलिस, दौंड तालुका क्रीडा शिक्षक संघटना, आदींनी संयोजनासाठी सहकार्य केले. 

विजेत्यांना १ लाख ६० हजार रूपयांची पारितोषिके...
मॅरेथॅान स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांना एकूण १ लाख ६० हजार रूपयांची बक्षिसांसह पदक व प्रमाणपत्र पारितोषिक स्वरूपात प्रदान करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news Pune news Marathon in Daund