खडतर परिस्थितीत 'प्रेम रंग'ची गोरेंकडून निर्मिती

कृष्णकांत कोबल
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

कवी नितीन देशमुख यांचेही एक गीत या चित्रपटात आहे. संगीतकार म्हणून शरद गोरे यांनी गीते संगीतबद्ध केली आहेत. सुप्रसिद्ध गायक राजेश दातार, राजेश्वरी पवार, राखी चौरे, अजित विसपूते यांनी पार्श्वगायन केले आहे.

मांजरी : विशिष्ट स्वप्न आणि ध्येय उराशी बाळगून ग्रामीण भागातील अनेक तरूण शहरात येत राहतात. त्यामध्ये पैशापेक्षा मनासारखे काम आणि आवड जोपासण्याचे समाधान काही तरूणांना हवे असते. असेच समाधान शोधत सोलापूरच्या ग्रामीण भागातून आलेल्या शरद गोरे यांनी साहित्याबरोबरच कला क्षेत्रातही आपला ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शनासह वेगवेगळ्या आठ जबाबदाऱ्या सांभाळत नुकतेच त्यांनी 'प्रेम रंग' या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले.

सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रुक येथून पुणे येथे आपल्या प्रतिभेला पैलू पाडण्यासाठी आलेल्या शरद गोरे यांनी प्रेमरंग या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन, दिग्दर्शक व निर्माता अशा तब्बल आठ भूमिका समर्थपणे बजावल्या आहेत. 

'रणांगण-एक संघर्ष' या चित्रपटाचे यापूर्वी गोरे यांनी लेखक व दिग्दर्शक म्हणून काम केले. 'पंखांतला आकाश', 'उत्तरपुजेची महापूजा', 'अन्नदान की पिंडदान' या लघू चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. रणांगण एक संघर्ष, उषःकाल, ढोलकीच्या तालावर या चित्रपटात, द शिवाजी मॅनेजमेंट गुरू या नाटकास, प्रेम, माझी सखी या अल्बमला गीतलेखन व संगीतकार म्हणून ही काम केले आहे. महिमा भुलेश्वराचा या अल्बमलाही संगीत दिले आहे.

प्रेम या अल्बममधील 'मी तूट तूट तुटायचे, तू लूट लूट लुटायचे' हे गीत रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. उषा मंगेशकर, रविंद्र साठे, उत्तरा केळकर, आनंद शिंदे, उर्मिला धनगर, ज्ञानेश्वर मेश्राम या दिग्गज गायकांनी गोरे यांच्या संगीतावर पार्श्वगायन केले आहे. 

सयाजी शिंदे, निशा परूळेकर, मोहन जोशी, पंढरीनाथ कांबळे, विजय कदम, सतीश तारे, दीपाली सय्यद अशा नामांकित कलाकारांनी गोरे यांनी दिग्दर्शक म्हणून केलेल्या चित्रपटात यापूर्वी अभिनय केलेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या संस्थेचे गोरे हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून गेल्या 25 वर्षांपासून काम करीत आहेत. 

प्रिय प्रिये, प्रेम हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ गोरे यांनी मराठीत काव्य  भाषांतरित केला आहे. जी.एस. एम. फिल्मनिर्मित प्रेमरंग या मराठी चित्रपटाचे चित्रिकरण भोर, महाड, वाई, महाबळेश्वर या परिसरात नुकतेच पूर्ण झाले आहे. प्रेमरंग या चित्रपटाची कथा व पटकथा शरद गोरे व रविंद्र जवादे यांची असून, सवांद व गीते शरद गोरे यांची आहेत.

कवी नितीन देशमुख यांचेही एक गीत या चित्रपटात आहे. संगीतकार म्हणून शरद गोरे यांनी गीते संगीतबद्ध केली आहेत. सुप्रसिद्ध गायक राजेश दातार, राजेश्वरी पवार, राखी चौरे, अजित विसपूते यांनी पार्श्वगायन केले आहे. प्रशांत मांडरे या सुप्रसिद्ध छायाचित्रकार यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. कला दिग्दर्शन म्हणून राहुल व्यवहारे, सांऊड इंजिनिअरिंग म्हणून निलेश बुटे यांनी काम केले आहे. नागपुरचा बंटी मेडके हा उद्यनमुख तरुण चित्रपटात मुख्य नायकाच्या तर सोलापुरची तरूणी विनिता सोनवणे मुख्य नाईकेच्या भुमिकेत दिसणार आहे.

रमाकांत सुतार हा खलनायकाच्या भुमिकेत आहेत. 
सहकलाकार म्हणुन प्रकाश धिंडिले, पंकज जुन्नोरे, विशाल बोरे, कोमल साळुंके, आशिष महाजन प्रविण देशमुख, निलोफर पठान, महेक शेख, संभाजी बारबुले असणार आहेत. हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रहेना सिंग व आश्विनी शिरपूर हे पाहुणे कलाकारांच्या भुमिकेत दिसणार आहेत. प्रेमरंग या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून प्रकाश धिंडिले यांनी काम पाहिले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Pune News Movie Prem Rang Struggling Sharad Gore