'एमपीएससी'चे विद्यार्थी उतरले रस्त्यावर; पुण्यात मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी, परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवावे, उत्तर पत्रिकेसाठी बारकोड प्रणालीचा वापर करावा, प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावावी, तलाठी पदाची परीक्षा घेऊन "एमपीएससी'द्वारे अधिकाधिक पदांची जाहिरात काढावी, "सी-सॅट' विषयाच्या पेपरसाठी पात्रतेचे निकष केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर करावेत, स्पर्धा परीक्षेतील डमी रॅकेट प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करावी, या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. 

पुणे : राज्य सेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करावी, तसेच कर सहायक, लिपिक टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक या परीक्षा एकत्रित न घेता स्वतंत्रपणे घ्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आज (गुरुवार) शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत आंदोलन केले. 

आपल्या मागण्यांसाठी एमपीएससी विद्यार्थी मोर्चा समन्वय समितीतर्फे आज शनिवारवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी, परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवावे, उत्तर पत्रिकेसाठी बारकोड प्रणालीचा वापर करावा, प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावावी, तलाठी पदाची परीक्षा घेऊन "एमपीएससी'द्वारे अधिकाधिक पदांची जाहिरात काढावी, "सी-सॅट' विषयाच्या पेपरसाठी पात्रतेचे निकष केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर करावेत, स्पर्धा परीक्षेतील डमी रॅकेट प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करावी, या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

तसेच, आयोगाकडून जे प्रश्‍न चुकतात किंवा रद्द करण्यात येतात, त्याचे आयोगाने संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे, परीक्षेत होणारी मास कॉपी थांबविण्यासाठी आयोगाने योग्य धोरण तयार करावे तसेच मास कॉपी करणाऱ्या उमेदवारांना काळ्या यादीत टाकावे, उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर तसेच हॉलमध्ये प्रवेश देताना तीन-चार वेळा तपासणी करावी, राज्य व जिल्हा पातळीवरील रिक्त जागा भरण्यात याव्यात, शिक्षक भरती करण्यात यावी, तीस टक्के नोकर कपातीचे धोरण रद्द करावे, या मागण्यासुद्धा करण्यात येणार आहेत. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.

पुण्यासह बारामती, यवतमाळ, नगर येथील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थीसुद्धा या मोर्चात सहभागी झाले होते. 

Web Title: Marathi news Pune news MPSC students agitation