खबऱ्यांच्या बदल्या नावापुरत्याच!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पुणे - रस्ते आणि चौकात बेकायदा दुकाने थाटणारे व्यावसायिक आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्यातील कंत्राटी कामगारांचे अर्थात, खबऱ्यांचे साटेलोटे मोडीत काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला खरा; पण माहिनोंमहिने एकाच भागात नोकरी करून आपले बस्तान बसविलेल्या बहुतांशी ‘खबऱ्यां’नी बदलीचा आदेश धुडकावला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी व्यावसायिकांकडून ‘वसुली’ कायम ठेवली आहे. सलग चार-चार महिने पगार मिळत नसल्याने ही ‘वसुली’ करावी लागत असल्याची कबुली काही ‘खबरे’ देत आहेत. राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यानेच कामगार बदलीचा निर्णय पाळण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शहरातील बहुतांशी भागात गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून, त्यात हातगाडी, पथारी आणि स्टॉलधारकांचा समावेश आहे. विशेषत- वाहने आणि नागरिकांची प्रचंड वर्दळ असलेल्या भागातच ही दुकाने थाटली आहेत. त्यामुळे अतिक्रमणे काढण्याची जोरदार मोहीम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याने हाती घेतली. त्यासाठी खाते आणि कंत्राटी कामगारांची नेमणूक केली आहे; मात्र काही कामगार व्यावसायिकांकडून बेकायदा पैसे घेऊन अतिक्रमणविरोधी कारवाईची कल्पना देत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे कारवाईसाठी बाहेर पडलेल्या पथकांना अनेकदा रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अनेक महिने एकाच भागात नोकरी करून या कामगारांनी आपले बस्तान बसविले असून, त्या-त्या भागातील व्यावसायिकांकडून ठराविक रक्कम महिन्याकाठी घेत असल्याची तक्रार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. त्याची दखल घेत, नव्या वर्षापासून कंत्राटी कामगारांच्या बदल्या करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतला. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयनिहाय कामगारांची यादीही जाहीर केली. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या. बदल्यांचा आदेश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिला; पण बहुतांशी कामगार नव्या नियुक्तीच्या ठिकाणी गेले नाहीत. विशेष म्हणजे, अशा कामगारांवर कारवाई झालेली नाही; मात्र ते आपल्या हद्दीतील बेकायदा व्यावसायिकांकडून पैसे घेत असल्याचे काही कामगारांनी सांगितले. त्यामुळे कंत्राटी कामगार आणि त्यांना पाठीशी घातलेल्या काही अधिकाऱ्यांनी आयुक्तांचा आदेश धुडकावल्याचे स्पष्ट  झाले आहे. 

कंत्राटी कामगारांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार कामे सुरू आहेत; मात्र अडचणींमुळे काही कामगार नव्या ठिकाणी काम करत नसल्याचे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

पगार नाही; बिले मात्र अदा
संपूर्ण शहर चकचक करण्याच्या उद्देशाने अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच नव्याने काही कामगारही भरण्याची प्रक्रिया सुरू आहे; परंतु जुन्या कामगारांना ठेकेदारांकडून पगार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत अनेकदा तक्रारीही होऊनही ठेकेदारांवर कारवाई होत नाही; मात्र ठेकेदारांना बिले दिली जात असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

Web Title: marathi news pune news pmc pune encroachment