प्री-नर्सरीसाठी मागितली अडीच लाखांची देणगी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

पुणे - पुणे शहरातील हचिंग्ज स्कूलमध्ये प्री-नर्सरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी 80 हजार रुपयांची फी भरल्यानंतरही "देणगी'च्या नावाखाली तब्बल अडीच लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित पालकांनी हा प्रकार "फेसबुक'वरील एका ग्रुपमध्ये मांडल्यानंतर त्यावर इतर पालकांनीही या संदर्भात भावना व्यक्त केल्या आहेत.

पुणे - पुणे शहरातील हचिंग्ज स्कूलमध्ये प्री-नर्सरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी 80 हजार रुपयांची फी भरल्यानंतरही "देणगी'च्या नावाखाली तब्बल अडीच लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित पालकांनी हा प्रकार "फेसबुक'वरील एका ग्रुपमध्ये मांडल्यानंतर त्यावर इतर पालकांनीही या संदर्भात भावना व्यक्त केल्या आहेत.

या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी "सकाळ टाइम्स'च्या प्रतिनिधीने त्या पालकांशी संपर्क साधला. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार, सोमवारी (12 मार्च) एका विद्यार्थ्याच्या पालकांना हचिंग्ज शाळेकडून प्रवेशासंदर्भात ई-मेल आला आणि शाळेत बोलाविण्यात आले होते. ते शाळेत गेले असता सुरक्षारक्षकाने तुसडेपणाची वागणूक देत शाळेच्या आवारात सोडण्यासही नकार दिला. काही वेळानंतर शाळेच्या कार्यालयात नेण्याऐवजी त्या सुरक्षारक्षकाने पालकांना अकाउंट्‌सच्या इमारतीच्या मागे असलेल्या एका खोलीत नेले. तिथे शाळेच्या अकाउंट्‌स विभागात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे अडीच लाख रुपये देणगीची मागणी केली. "शाळा फुटबॉलचे मैदान तयार करणार आहे, त्यासाठी सर्व पालकांना देणगी अनिवार्य करण्यात आली आहे,' अशी माहिती त्या महिलेने दिली. त्यावर आम्ही विचारले, की आम्ही ही संपूर्ण रक्कम भरू शकलो नाही तर काय होईल? यावर त्या महिलेने उत्तर दिले, "मग प्रवेश घेता येणार नाही!'

याप्रकरणी "हचिंग्ज स्कूल'च्या मुख्याध्यापकांशीही संपर्क साधला. "ही देणगी सर्वांना अनिवार्य नाही. पालक त्यांच्या इच्छेनुसार देणगी देऊ शकतात,' असा दावा मुख्याध्यापिका रिटा काटवती यांनी केला.

आम्ही देणगी न देता इंग्रजी शाळेत शिकलो. दुर्दैवाने शिक्षणसम्राट, राज्यकर्ते, शिक्षणमंत्री सगळे राजकारणीच निघाले. शिक्षणात भ्रष्टाचार, अनागोंदी आणि देणग्यांचा सुळसुळाट झाला. या वाईट प्रथा थांबविण्यासाठी जाणकार नागरिक, पीडित पालक, जागरूक मतदार आणि प्रामाणिक करदाते यांनी सोशल मीडियाचा वापर करून वरचेवर या प्रश्‍नांना वाचा फोडली पाहिजे. तरच हा प्रकार आटोक्‍यात येईल आणि पाल्यांचे नुकसान टळेल. चांगली पिढी घडवायची असेल, तर हेच योग्य पाऊल आणि वेळ!
- नीलम सांगलीकर

"ज्या शाळेची फी जास्त, ती उत्तम' असे हल्ली पालकांनाच वाटते त्यामुळे यत्र-तत्र-सर्वत्र शिक्षणाचा बाजार बोकाळला आहे. या शिक्षणाच्या बाजारीकरणावर कुणाचेही नियंत्रण नाही.
- प्रशांत जोशी

शालेय शिक्षण पूर्णत: बिघडलेले आहे. त्यात कायम प्रयोग चालू असतात. दहावीचा निकाल भरमसाट लागतो, कारण यांची दुकाने चालावीत. त्यात पालकांच्या मोठ्या अपेक्षा! पाल्याची आवड, कल न पाहता "जास्त फी आणि नाव आहे म्हणजे शाळा छान' असे समीकरण तयार करणार.
- मिलिंद

असा अनुभव मलाही आला आहे. अशा वेळी लोक काही संबंध नसताना "मराठी शाळांमध्ये प्रवेश घ्या' सांगतात. त्यांच्यासाठी मोजक्‍या दोन-तीन चांगल्या मराठी शाळा सोडल्या, तर प्रवेश कुठे घ्यावा? मराठी शाळा चांगल्या असतील, तर पालकही त्यांना पसंती देतीलच. पण म्हणून "आता दुसरीकडे कुठे जाणार असाल तर मुकाट्यानं अन्याय सहन करा किंवा पैसे भरा' असे म्हणायचे आहे का?
- वैभव

माझे इंजिनिअरिंगचे चार वर्षांचे शिक्षण सगळे मिळून 24 हजार रुपयांत झाले. तेही फक्त दहा वर्षांपूर्वी! आता प्री-केजी, नर्सरीलाही 40-50 हजार रुपये फी? सरकार नक्की करतंय तरी काय?
- राहुल

Web Title: marathi news pune news pre nursery school donation demand