शिवसृष्टीला दुसरी जागा; कचरा डेपोच्या जागी मेट्रो स्टेशनच

मंगेश कोळपकर 
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

वनाज -रामवाडी मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावर जुन्या कचरा डेपोच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा ठराव महापालिकेन या पूर्वी केला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावाही सुरू आहे. मात्र, मेट्रो मार्गावर या जागेवर मेट्रोचा डेपो उभारायचा असल्याचे महामेट्रोने म्हटले होते.

पुणे : पुण्यातील बहुचर्चित शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सुकर केला. चांदणी चौकाजवळील जैववैविध्य आरक्षण उद्यानाच्या (बीडीपी) जागेत तब्बल 50 एकर जागेत शिवसृष्टी होणार आहे. त्यासाठी पुरेसा निधी देण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे 11 फेब्रुवारीपासून मेट्रोचे काम बंद पाडण्याचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी केली.

पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह महापालिकेतील सर्व राजकीय पक्षांचे गटनेते या बैठकीत उपस्थित होते. "सह्याद्री'वर सुमारे दीड वाजता सुरू झालेली बैठक दोन-सव्वा दोनच्या सुमारास यशस्वीरित्या पार पडली. 

वनाज -रामवाडी मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावर जुन्या कचरा डेपोच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा ठराव महापालिकेन या पूर्वी केला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावाही सुरू आहे. मात्र, मेट्रो मार्गावर या जागेवर मेट्रोचा डेपो उभारायचा असल्याचे महामेट्रोने म्हटले होते. शिवसृष्टी आणि त्या खाली मेट्रोचा डेपो उभारावा, असाही पर्याय आला होता. मात्र, शिवसृष्टी आणि मेट्रोचा डेपो हे दोन्ही एकाच ठिकाणी उभारणे शक्‍य नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर बैठकीच्या अगोदरच चांदणी चौकातील बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मान्य करावा, यासाठी मोर्चेबांधणी झाली आणि बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शिवसृष्टीसाठी लागणारी बीडीपीमधील जागा महापालिका संपादीत करणार आहे. त्यासाठी मोबदल्याचे धोरण राज्य सरकार लवकरच जाहीर करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Marathi news Pune news Pune Metro Shivsrushti in Kothrud area