शौर्याला सलाम, देशभक्तीचा जल्लोष 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

पुणे : दुचाकी रॅलीतून उलगडलेले एकात्मतेचे महत्त्व... उल्लेखनीय कार्याबद्दल झालेला दिग्गजांचा सन्मान... समूह गीतातून विद्यार्थ्यांनी जवानांना केलेला सलाम अन्‌ अवयवदानाविषयी जवानांनी केलेली जनजागृती अशा देशभक्तिपर वातावरणात भारताचा प्रजासत्ताक दिन शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध संस्था- संघटनांकडून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 

पुणे : दुचाकी रॅलीतून उलगडलेले एकात्मतेचे महत्त्व... उल्लेखनीय कार्याबद्दल झालेला दिग्गजांचा सन्मान... समूह गीतातून विद्यार्थ्यांनी जवानांना केलेला सलाम अन्‌ अवयवदानाविषयी जवानांनी केलेली जनजागृती अशा देशभक्तिपर वातावरणात भारताचा प्रजासत्ताक दिन शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध संस्था- संघटनांकडून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 

शनिवार वाड्यावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, प्रांताधिकारी भाऊ गलंडे, तहसीलदार गीता दळवी उपस्थित होते. 

पुणे महापालिकेकडून महात्मा जोतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर मुक्ता टिळक व उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन झाले. पुणे मनपाच्या सुरक्षा, अग्निशामक दलाच्या वतीने संचलन करण्यात आले व मानवंदना देण्यात आली. पालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, डॉ. राजेंद्र जगताप उपस्थित होते. 

पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे कॉंग्रेसभवन येथे झालेल्या कार्यक्रमात शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर कॉंग्रेस भवनापासून "लोकतंत्र बचाव- संविधान बचाव' ही दुचाकी रॅली काढण्यात आली. माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, आमदार अनंत गाडगीळ, बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे आणि अभय छाजेड आदी उपस्थित होते. पुणे महापालिकेतर्फे विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा सत्कार महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक आनंद रिठे, अजय खेडेकर, प्रवीण चोरबेले, नगरसेविका राणी भोसले, स्मिता वस्ते, रत्नप्रभा जगताप उपस्थित होते. 

पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागूल आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते भारत- पाकिस्तान युद्धात शौर्य दाखविणाऱ्या जवानांचा सन्मान त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला. कृष्णा सावंत, आनंदराव घोडेस्वार, नरसिंग शिंदे, गोरख जाधव, जे. एस. देसाई या जवानांचा सत्कार करण्यात आला. माजी उपमहापौर आबा बागूल या वेळी उपस्थित होते. कॉंग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे मुकेश धिवार यांनी ध्वजवंदन केले. पीयूष धिवार, रोहित लोंढे, अक्षय केदारी उपस्थित होते. कॉंग्रेसच्या कसबा विभागातर्फे दादा भोकरे यांनी ध्वजवंदन करून भारतमातेला सलाम केला. पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील पक्ष कार्यालयात पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शहराध्यक्षा खासदार ऍड. वंदना चव्हाण, चेतन तुपे, रवींद्र माळवदकर, व्यंकटराव अवधूत, नगरसेवक रुख्साना इनामदार आदी उपस्थित होते. पक्षाच्या क्रीडा सेलकडून पर्यावरणसंवर्धन सायकल स्वारी करणाऱ्या सायकलस्वारांचा सत्कार करण्यात आला. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलपासून दत्तवाडी पोलिस ठाण्यापर्यंत काढलेल्या एकात्मता रॅलीत नागरिकांनी सहभाग घेतला. 

यशस्वी ऍकॅडमी फॉर स्किल्स आणि श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्टतर्फे सुरू केलेल्या "श्री संतमाई कौशल्य विकास केंद्राचे' उद्‌घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले. सुनील रुकारी, यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्‍वेश कुलकर्णी, सुनीलकुमार गर्ग, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे व नीलिमा खाडे उपस्थित होते. 

वन स्टेप फाउंडेशन आणि एसजीएम मॉलतर्फे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींना खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले. इंदिरा भिलारे, विराज तावरे, सचिन बेनकर, महेश घाग, पूजा भाले यांचा सत्कार करण्यात आला. ताज फाउंडेशनतर्फे ऍड. रफिक शेख यांनी ध्वजवंदन केले. दीपक शिरवळकर, शिरीष चरवड, सचिन बलकवडे उपस्थित होते. कृष्णाई महिला मंडळातर्फे लीला गायकवाड यांनी ध्वजवंदन केले. मंडळाच्या संस्थापिका भारती कोंडे, जयश्री पाटील, प्राजक्ता गरुड उपस्थित होते. प्रियदर्शनी संस्थेकडून आयोजित कार्यक्रमात बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. मृत्युंजय मित्र मंडळाकडून ऍड. फैयाज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. मंडळाचे तुषार पंडित, मंगेश खेडेकर, सुनील पंडित, अजय मोरे उपस्थित होते. वंदन तुला प्रतिष्ठानतर्फे मुलांसाठी मैदानी स्पर्धा आयोजिल्या होत्या. संजय मोरे, संतोष शिंदे, संतोष मिरजकर उपस्थित होते. ताराबाई भिसे आणि जगन्नाथ कांबळे स्मृती प्रतिष्ठान आणि अष्टप्रधान मित्र मंडळातर्फे सुमारे 450 मुलांना खाऊवाटप करण्यात आले. विनायक भिसे, संजय कांबळे, रविराज कांबळे उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते हाजी बंदेनवाज मक्का यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. तसेच, गोखलेनगर भागातील मुलांना खाऊवाटप केले. कासम शेख, सलीम शेख, मेहबूब मक्का उपस्थित होते. जनता दलाचे अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन झाले. हनुमान ननावरे, इस्माईल शेख, अविनाश देवकुळे आणि विलास भंडारी उपस्थित होते. या वेळी मुलांना खाऊवाटप करण्यात आले. श्रीमंत जयभवानी मित्रमंडळ आणि हनुमान व्यायाम मंडळाकडून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सगीरा एज्युकेशन मेडिकल फाउंडेशनतर्फे रॅली काढून संविधानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. अशोक येनपुरे, जैनुद्दिन शेख, सिराज शेख, मदिना तांबोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण आंबोळे उपस्थित होते. दाऊदी बोहरा समाज आणि श्री समर्थ मिनी मार्केट स्टॉलधारक संघटनेतर्फे ध्वजवंदन करण्यात आले. 

रिपब्लिकन पक्षातर्फे (आठवले गट) पक्षाच्या पुणे स्टेशन येथील कार्यालयात शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. या वेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, हरपालसिंग अहलुवालिया, बाळासाहेब जानराव, रफिक दफेदार, असित गांगुर्डे, अशोक शिरोळे, महिपाल वाघमारे, श्‍याम सदाफुले, हलिमा शेख, विक्रांत भोसले आदी उपस्थित होते. 

लष्कराकडूनही प्रजासत्ताक दिन उत्साहात 
घोरपडीतील नॅशनल वॉर मेमोरिअल येथे आयोजित कार्यक्रमात बिग्रेडिअर राजीव सेठी यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रजासत्ताक दिनाला नॅशनल वॉर मेमोरिअल नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले होते. कार्यक्रमाला सैन्य दलातील अधिकारी उपस्थित होते. गिरीनगर येथील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे अवयवदानविषयक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजिला होता. कमांडंट मेजर जनरल ए. के. सपरा उपस्थित होते. रीबर्थ फाउंडेशनच्या मदतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. साधना सपरा यांनी अपना घर अनाथाश्रमातील मुलांना भेटवस्तू आणि मिठाईचे वाटप केले. इन्स्टिट्यूटमधील अधिकारी आणि विद्यार्थ्यांचा क्रिकेट सामनाही रंगला. 

शाळा- महाविद्यालयांमध्येही प्रजासत्ताक दिन साजरा 
उत्कृष्ट पथसंचलन... देशभक्तिपर गीते... कवायतीचे देखणे सादरीकरण अन्‌ कथाकथनातून विविध शाळांमध्ये जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात आला. शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मान्यवरांच्या हस्ते शाळांमध्ये सकाळी ध्वजवंदन करण्यात आले. गोखलेनगर भागातील वीर बाजीप्रभू प्रशाला आणि कॅ. गोळे माध्यमिक विद्यालयात घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष आदित्य माळवे यांनी ध्वजवंदन केले. अशोक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यक्रमात वार्षिक पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आणि देशभक्तिपर गीते सादर केली. रेखा दराडे, कल्याणी साळुंखे, अनुजा पाटील, इंद्राणी रानडे उपस्थित होते. रास्ता पेठेतील प्राथमिक शिक्षक मंडळ शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत अभिजित जोग यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. विद्यार्थ्यांनी कवायत, लेझीम आणि समूहगीते सादर केली. विद्यार्थिनी कृत्तिका पाडमुख आणि श्रीराज गुरसाळे यांना गौरविण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष रमेश जैन, चिटणीस अनिल नवले, हेमंत जोशी, मीना कूर्मवंशी आणि मुख्याध्यापिका शुभांगी सदनकर उपस्थित होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम कॅम्पसमध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. टी. एस. भाल यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. एम. सी. ई. सोसायटी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार उपस्थित होते. संस्थेच्या 25 हजार विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन करून मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, सहसचिव इरफान शेख, स्कूल ऑफ आर्ट ऍण्ड आर्ट ऍकॅडमीच्या संचालक हेमा जैन उपस्थित होते. 

शिवाजीनगरला पोलिसांचे संचलन 
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर झाला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या निमित्ताने पोलिसांनी पथसंचलन सादर केले. पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना सेवा कालावधीतील उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपतिपदक मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी सौरभ राव, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलिस सहआयुक्त रमेश कदम, अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) प्रदीप देशपांडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) साहेबराव पाटील आणि पोलिस अधीक्षक सुवेझ हक उपस्थित होते. पथसंचलनासाठी एकूण 17 प्लाटूनची रचना करण्यात आली होती. त्यात पोलिस आयुक्तालयासह 17 प्लाटूनचा सहभाग होता. वाद्यवृदांच्या वादनाने उपस्थितांची मने जिंकली. शाळांमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पथसंचलनाचे नेतृत्व लष्कर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त जयश्री गायकवाड आणि स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले. पथसंचलनात मोटारसायकल रायडर, रुद्र श्‍वान पथक, वज्र वाहन, जलद प्रतिसाद पथक, मोबाईल कंट्रोल वाहनांसह सहा चित्ररथ सहभागी झाले. 
 
खडकी आणि पुणे कॅंटोन्मेंटमध्ये मिरवणूक 
पुणे कॅंटोन्मेंट परिसरात केअर टेकर्स सोसायटीतर्फे मिरवणूक काढण्यात आली. गोळीबार मैदानापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झाला. विविध धर्मांच्या प्रातिनिधिक वेशभूषेतील विद्यार्थी "हम सब एक'चा संदेश देत होते. याच चित्ररथात भारताच्या संविधानाचे महत्त्व समजावून सांगणारा फलक होता. सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे, बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड, सदस्य दिलीप गिरमकर, प्रशांत यादव, नितीन पंडित, रणजित परदेशी सहभागी झाले. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या मालमत्ता विभागाचे मुख्य संचालक एल. के. पेगू यांच्या हस्ते खडकी कॅंटोन्मेंट बोर्डात ध्वजारोहण झाले.

उपाध्यक्ष अभय सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, सुरेश कांबळे, मनीष आनंद, कमलेश चासकर, कार्तिकी हिवरकर, पूजा आनंद, दुर्योधन भापकर, वैशाली पहिलवान आदी उपस्थित होते. पुणे कॅंटोन्मेंट बोर्डात कॅंटोन्मेंटच्या कार्यालयीन अधीक्षक राजमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी उपाध्यक्ष अतुल गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, सदस्य विनोद मथुरावाला, सुरेश पवार, विवेक यादव, प्रियांका श्रीगिरी, डॉ. किरण मंत्री, दिलीप गिरमकर आदी उपस्थित होते. या वेळी कार्यालय, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news pune news republic day celebrations in Pune