साने गुरुजी वसाहतीची लवकरच फेरउभारणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

साने गुरुजी वसाहतीची पुनर्उभारणी करण्यात येणार आहे. मात्र, याबाबतच्या प्रस्तावातील काही सूचनांवर बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
- योगेश मुळीक, अध्यक्ष, स्थायी समिती

पुणे - महापालिकेच्या अंबिल ओढा येथील साने गुरुजी वसाहतीची पुनर्उभारणी करण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी तेथील रहिवाशांना सुमारे ४८४ चौरस फुटांची घरे देण्याबाबतचा निर्णय अद्याप रेंगाळला आहे. त्यामुळे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या वसाहतीच्या सुधारित प्रस्तावावर पुढील आठवड्यात निर्णय होणार असून, महापालिकेतील पदाधिकारी आणि आयुक्त कुणाल कुमार यांची एकत्रित बैठक होणार आहे.

घरांची दुरवस्था; रहिवासी त्रस्त
महापालिकेकडील सेवकांसाठी ५० वर्षांपूर्वी ही वसाहत उभारण्यात आली आहे. त्यात छोट्या-मोठ्या अशा ४५५ खोल्या असून, आज रोजी साडेचारशेहून अधिक जणांना या खोल्या भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. परंतु, गेल्या आठ-दहा वर्षांपासून वसाहतीतील घरांची दुरवस्था झाली असून, इमारती धोकादायक बनल्या आहेत. विशेषतः पावसाळ्यात प्रचंड गैरसोय होत असल्याने रहिवासी त्रस्त झाल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले.

आयुक्‍तांशी चर्चा करून निर्णय
रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘बीओटी’तत्त्वावर या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार २०१० मध्ये निविदाप्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्याची घोषणाही झाली; पण बांधकामास पर्यावरण विभागाची परवानगी न मिळाल्याने ही योजना रखडली. स्थानिक नगरसेवक धीरज घाटे यांनी पाठपुरावा करून वसाहतीच्या बांधणीची मागणी केली आहे. त्यानुसार संबंधित ठेकेदाराला ही जागा ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्तावही स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. परंतु, याबाबत आयुक्तांबरोबर बैठक घेऊन चर्चा करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला.

६२ भाडेकरूंबाबत नवे नियम
वसाहतीतील खोल्यांचा आकार कमी असल्याने त्या अपुऱ्या पडत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. त्यामुळे ३७६ ऐवजी ४८४ चौरस फुटांचे घर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. वसाहतीची पुनर्उभारणी केल्यानंतर भाडेकरू रहिवाशांना ४८४ चौरस फुटांचे घर मिळणार आहे. महापालिकेच्या सेवेत नसलेल्या ६२ भाडेकरूंबाबत नवे नियम ठरविण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

४५५ वसाहतीतील खोल्यांची संख्या
४५३ भाडेकरूंची संख्या
४८४(चौरस फूट) नव्या योजनेतील घरे

Web Title: marathi news pune news sane guruji colony reconstruction