स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम गेली दोन वर्षे रखडलेले

Sangavi
Sangavi

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी प्रभाग क्रं 32 मधील पवना नदी तिरावर असलेल्या स्मशानभुमीचे काम गेली दोन वर्षापासुन संथ गतीने सुरू असल्याने सांगवी व परिसरातील नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे पावणे तीन कोटी रूपये नुतनिकरण खर्चाचे हे काम स्थापत्य विभागामार्फत प्रस्तावान्वये शेड्युल बी मधील रकमेपेक्षा 2.50% दराने स्विकृत केले होते. त्यानुसार कामाचा आदेश विर्गत करण्यात आला होता.

संबंधित,कन्स्ट्रक्शन यांनी एक वर्षात हे काम पुर्ण करण्याचे बंधनकारक असताना निवेदनानुसार हे काम फेब्रुवारी 2017 ला पूर्ण व्हायला हवे होते. मात्र सद्यस्थितीत अजुनही पुर्ण होताना दिसत नाही. दरम्यानच्या काळात अत्यंविधी व इतर अंत्यविधी धार्मिक विधीसाठी नागरीकांनी त्रास सहन केला आहे. अजून कुठपर्यंत त्रास सहन करायचा असा संताप नागरीकांमधून व्यक्त केला जात आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. चार महिन्यांत पावसाळा सुरू होईल. गेली दोन वर्ष नागरीकांनी उन वारा पाऊस, कामाचा राडारोडा यातुन मार्ग काढत येथे अंत्यविधी केले आहेत.

अत्यंविधीच्या जागेचे पुर्वीचे पत्राशेड काढुन या जागी नविन आरसीसी स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. मात्र परिसरातील निवाराशेडचे काम, घाट परिसरातील इतर कामे संथ गतीने सुरू आहेत. नागरीकांना यातुनच मार्ग काढत अंत्यविधी उरकावा लागतो. सदर जागा ही महापालिकेची नसल्याने मुख्य अंत्यविधी जागा वगळता इतर परिसराची निवाराशेड उभारण्याची जागा मालकाचा मोबदला पालिकेकडुन मिळत नसल्याने या कामात अडचणी येत होत्या. याबाबत स्थानिक नागरीकांच्या वतीने मनसेचे राजु सावळे यांनी पालिका आयुक्त व "ह" प्रभाग कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित जागा मालकाचा मोबदला व कागदपत्रांची शहानिशा करून संबंधित प्रश्न तात्काळ मार्गी लावावा व गेली दोन वर्षापासुन नागरीकांची होणारी गैरसोय थांबवावी. येत्या पंधरा दिवसात नागरीकांना कामाचा खुलासा करून कळवावे अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. स्मशानभुमीचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू झाले होते. सत्ताबदलानंतर ते रेंगाळल्याने यातही राजकारण आडवे येत असल्याने नागरीकांमधुन नाराजीचा सुर उमटत आहे. तर सत्ताधारी मंडळीने माजी नगरसेवकाने कामात अडथळे आणल्याचा आरोप वेळो वेळी केला आहे. यातही राजकारणाचा कलगीतुरा सांगवीकरांना अनुभवयास मिळत आहे.

याबाबत ह प्रभाग कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. याबाबत नगरसेवक हर्षल ढोरे म्हणाले, स्मशानभुमीचे काम माजी सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात सुरू होते. ते वेळेत पुर्ण झाले नाही. तर त्यात या ना त्या कारणामुळे सदर कामात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. विद्यमान नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून काम तत्काळ पुर्ण करून घेण्याबाबत सुचना दिल्या आहेत.

याबाबत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे म्हणाले, सध्या प्रभागात चार नगरसेवक आहेत. यांचे काम म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असे आहे. संबंधित कामास आमचा विरोध किंवा हस्तक्षेप कधीच नव्हता नसणार आहे. मात्र रितसर प्रत्यक्ष दहन  शेडच्या व्यतिरिक्त जागेचा न्यायिक पद्धतीने जागा मालकास मोबदला मिळावा असे लेखीपत्राने आयुक्त व संबंधित विभागास कळविले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com