ससूनमध्ये गर्भवतींच्या चाचण्या मोफत ; केसपेपरवर स्वतंत्र शिक्का देऊन सर्व सेवा देणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

ससून रुग्णालयामध्ये गर्भवतींना सर्व चाचण्या, शस्त्रक्रिया आदी सेवा मोफत आहे; परंतु शुल्कवाढ झाल्यानंतर जर काही लोकांकडून पैसे घेतल्याची प्रकरणे असू शकतात. त्यासाठी बाह्यरुग्ण कक्ष व उपचारासाठी दाखल सर्व गर्भवतींच्या केसपेपरवर स्वतंत्र शिक्का मारला जाईल. त्यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व गर्भवतींना प्रसूतीपूर्व चाचण्यांसह उपचार मोफत दिले जातील. 

- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
 

पुणे : राज्य सरकारच्या आदेशानुसार "केसपेपर, सोनोग्राफी, एक्‍स-रे'सह अन्य सेवांसाठीचे शुल्क वाढविण्यात आले. त्यामुळे गर्भवतींसह सर्व रुग्णांना शुल्कवाढीचा फटका बसला होता. त्यावर गर्भवतींना "प्रसूतीपूर्व चाचण्या' मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण कक्ष व दाखल असलेल्या सर्व गर्भवतींच्या केसपेपरवर स्वतंत्र शिक्का देण्याच्या सूचना ससून रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्या. 

ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये पुणे शहर व जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांमधून आर्थिक दुर्बल घटकांतील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मोफत व अत्यल्प दर असलेल्या सेवांचे शुल्क गेल्या तीन महिन्यांपासून वाढविले आहेत. अचानक दरवाढ झाल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामध्ये सोनोग्राफीसह अन्य तपासण्यांच्या शुल्कवाढीचा फटका गर्भवतींना देखील बसत असल्याबद्दलचे "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची गांभीर्याने दखल घेतली. 

दरम्यान, विविध संघटनांनी ससून शुल्कवाढीसंदर्भात आंदोलन केले होते; तसेच ससून रुग्णालय व बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची भेट घेत शुल्कवाढीवर फेरविचार करण्यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन दिले होते. या वेळी गर्भवतींना "प्रसूतीपूर्व चाचण्या' मोफत देण्याची आग्रही भूमिका मांडली होती. 

"जन आरोग्य मंच'चे सदस्य डॉ. किशोर खिलारे म्हणाले, ""राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्व सरकारी रुग्णालयांमधील विविध सेवांचे शुल्क तीस ते शंभर टक्‍क्‍यांपर्यंत वाढविले आहे. याची सर्वांत मोठी झळ आर्थिक दुर्बल घटकांतील गर्भवतींना बसणार आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण कक्ष आणि प्रसूतीसाठी दाखल सर्व महिलांना मोफत सेवा द्याव्यात, अशी मागणी केली होती. त्यावर ससून रुग्णालय प्रशासनाकडून सकारात्मकता दर्शवली आहे.'' 

Web Title: Marathi News Pune News Sasoon Hospital Pregnant Woman Test will Free