बेकायदा सावकारी, जबरी चोरी प्रकरणी परवानाधारक सावकारास अटक 

arrested
arrested

दौंड (पुणे) : दौंड शहरात एका शिक्षकाची बेकायदा सावकारीच्या माध्यमातून आर्थिक पिळवणूक करणे आणि जबरी चोरी केल्याप्रकरणी एका परवानाधारक खासगी सावकारास अटक करण्यात आली आहे. मासिक पाच टक्के व्याजदराने दिलेल्या 3 लाख 10 हजार रूपयांच्या कर्जापोटी साडेपाच वर्षात व्याजापोटी तब्बल 10 लाख 23 हजार रूपये वसूल करून देखील शिवीगाळ व दमदाटी करीत मुद्दलची मागणी केल्याने त्रस्त शिक्षकाने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 

दौंड पोलिस ठाण्यात नगर जिल्ह्यातील आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे कैलास लक्ष्मण चौरे (रा. दत्तनगर, गोपाळवाडी, ता. दौंड) यांनी सोमवारी (ता. 5) फिर्याद दाखल केली आहे. कैलास चौरे यांनी 12 जानेवारीला परवानाधारक सावकार राजू बाबूराव गायकवाड (रा. सिध्दार्थनगर, दौंड) यांच्याकडून कौटुंबिक कारणांसाठी मासिक पाच टक्के व्याजदराने तीन लाख दहा हजार रूपये घेतले होते. व्याजाने दिलेल्या रकमेच्या पोटी राजू गायकवाड याने कैलास चौरे यांच्याकडील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या दौंड शाखेतील खात्याचे पासबुक व स्वाक्षरी केलेल्या कोऱ्या बँक स्लिपा घेतल्या होत्या. स्लिपांचा वापर करीत राजू याने चौरे याच्या बॅंक खात्यातून सहा महिन्यात एकूण 93 हजार रूपये काढून घेतले होते. 

दरम्यान कैलास चौरे यांची नगर जिल्ह्यात बदली झाल्याने राजू याने कैलास चौरे यांच्या पत्नीचे भारतीय स्टेट बॅंकेच्या दौंड येथील राज्य राखीव पोलिस दल शाखेतील खात्यावरील एटीएम कार्ड मागितले. कार्ड देण्यास नकार दिल्यानंतर राजू याने जुलै २०१२ मध्ये कार्ड हिसकावून घेतले होते व त्या कार्डद्वारे ३० ऑगस्ट २०१७ पर्यंत दर महिन्याला १५ हजार ५०० रूपये काढून घेतले होते. कैलास चौरे यांच्या तक्रारीनंतर राजू गायकवाड याच्याविरूध्द जबरी चोरी करणे, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलमांनुसार सावकारी परवान्यातील अटींनुसार सावकारी व्यवसाय न करणे, अनुज्ञप्तीशिवाय सावकारी व्यवसाय करणे, दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी बळाचा वापर करून धाकदपटशा करणे, कर्जदाराच्या मालमत्तेच्या वापरात अडथळा करणे, पाठलाग करणे, कर्जदारास उपद्रव करणे, आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
                    
राजू गायकवाड हा बहुजन समाज पक्षाचा दौंड विधानसभा मतदारसंघाचा माजी अध्यक्ष असून शहरातील गजानन सोसायटी मधील न्यू इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळेचा संचालक आहे. दौंड पोलिस ठाण्यात ३१ जानेवारी २०१८ पासून एकूण सहा सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com