नागरिकांना वाटते, असा होईल सिंहगड रोड सुसाट...

Sinhgad-Road
Sinhgad-Road

धायरी - आनंदनगर चौकातील प्रस्तावित उड्डाण पुलामुळे सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचे वृत्त ‘सकाळ‘ने रविवारच्या अंकात प्रसिद्ध करून वाचकांना वाहतूक कोंडीवर पर्याय सुचविण्याचे आवाहन केले. वाचकांनी या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. महापालिकेने गृहित न धरलेले पर्याय नागरिकांनी समोर आणले आहेत.

रस्त्याकडेला बसणारे फळ विक्रेते, भाजी विक्रेते सिंहगड रस्त्याच्या वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहेत. त्यांना महापालिकेने दुसरीकडे जागा द्यावी. रस्त्यावर सुरू झालेल्या मॉलकडे अंडरग्राउंड पार्किंगची सोय नाही.  
- धनंजय देशमुख

स्वारगेटपर्यंत येणारी मेट्रो धायरी फाट्यापर्यंत घेण्यात यावी व त्यासाठी नळ स्टॉपवर जसा दुमजली उड्डाण पूल प्रस्तावित आहे, तसेच सिंहगड रस्त्यावर राजाराम पुलापासून ते फन टाइमपर्यंत दुमजली उड्डाण पूल करावा. आज ते खर्चिक वाटतील, पण यामुळे पुढील २५ वर्षे वाहतूक आणि इतर समस्या सुटतील, हे नक्की.
- सौरभ देशपांडे

रामकृष्ण मठ ते दांडेकर पूल चौकात स्वारगेटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका लेनमध्ये अंदाजे दोनशे फूट लांबीचा उड्डाण पूल तयार करावा. त्यामुळे गणेशमळा चौक व रामकृष्ण मठ चौकात वाहनांची गर्दी होणार नाही. पाणी टँकर भरणा केंद्राजवळील भिंत गरज नसेल तर काढून टाकल्याने मुख्य रस्ता २० फूट रुंद होईल.
- हेमंत भालेराव

या उड्डाण पुलाचा आराखडा तयार करताना भविष्यात ‘स्वारगेट ते खडकवासला’ मेट्रो सुरू करता येईल याचा विचार करावा.
- चंद्रकांत पाटील

उड्डाण पुलावर इतके पैसे खर्च करण्यापेक्षा वाहतूक पोलिसांनी लोकांना नियम पाळण्याची सक्ती केली तरीही प्रश्न सुटेल. उड्डाण पुलाच्या कामास दाेन वर्षांचा कालावधी लागेल, त्यामुळे या काळात आणखी वाहतूक कोंडी होईल. 
- मृदुला देव

दांडेकर पूल ते फनटाइमपर्यंत हा उड्डाण पूल तयार करण्यात यावा. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ आणि इंधनाची बचत होईल. 
- प्रमोद पाटील

मोनोरेलचा पर्याय 
खडकवासला ते स्वारगेट सुमारे १३ कि. मी.च्या रस्त्यावरून मोनोरेलची उभारणी सहज करण्याजोगी आहे. याला अत्यंत कमी जागा लागते. मुख्य म्हणजे मोनोरेल उभारणीचा खर्च मेट्रोच्या मानाने खूप कमी आहे व अल्प वेळेत कार्यान्वित होऊ शकते. मोनोची वारंवारिता चांगली ठेवल्यास बहुसंख्य ऑफिसला जाणारे, कॉलेजला जाणारे, महिला याचा उपयोग करून घेऊ शकतात, त्यामुळे वेळेची बचत होईल, तसेच अपघात टळतील.
- श्रीकांत आडकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com