'विद्यार्थी स्टेशनरी भांडार' आता शाळेतच

महेंद्र शिंदे
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

खेड-शिवापुर (पुणे) : विद्यार्थ्यांना पेन्सील, वही, पेन, पट्टी असे शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी शाळेबाहेर जावं लागत नाही. या वस्तु त्यांना शाळेच्या स्टेशनरी भांडारातच मिळतात. विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी चालवत असलेले हे अनोखे 'विद्यार्थी स्टेशनरी भांडार' उघडलंय वेळु (ता. भोर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत. 

शाळेतील शिक्षकांच्या संकल्पनेतून साकारलेला हा पुणे जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम आहे. भोरचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांच्या हस्ते बुधवारी या उपक्रमाचे उदघाटन झाले. जिल्हा परिषद सदस्या शलाकाताई कोंडे, पंचायत समिती सदस्या पूनम पांगारे, भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पांगारे, वेळुच्या सरपंच रेश्मा तांबोळी, शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा शिगवण आणि शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी बाहेर जावे लागते. या वस्तु विद्यार्थ्यांना शाळेतच मिळाव्यात या उद्देशाने शाळेत विद्यार्थी स्टेशनरी भांडार सुरु करण्याची संकल्पना शिक्षकांना सुचली. त्यानुसार शाळेत सुरु झालेल्या या विद्यार्थी स्टेशनरी भांडाराचे बुधवारी उदघाट्न झाले. 

विद्यार्थ्यांना पाहिजे असलेल्या वस्तु शाळेतच उपलब्ध होतील. शिवाय दर आठवड्याला दोन विद्यार्थी हे स्टेशनरी भांडार चालविणार आहेत. त्यामुळे वस्तुंच्या खरेदी विक्रीतुन व्यवहार ज्ञान, हिशेबाचा लेखाजोखा याची विद्यार्थ्यांना माहिती होईल. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यात व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यातून मिळणारी रक्कम शाळेसाठीच वापरण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापिका शिगवण यांनी सांगितले. गटविकास अधिकारी हराळे आणि जिल्हा परिषद सदस्य कोंडे यांनी वेळुच्या शाळेत सुरु झालेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.

Web Title: Marathi news pune news stationary at school