'सहकार विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पुणे - राज्यात गेल्या सतरा वर्षांपासून बंद पडलेल्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. राज्यातील बॅंका वगळता इतर सहकारी संस्थांना आर्थिक सहकार्य करून त्या बळकट करण्याचा मार्ग यामुळे खुला झाला आहे. 

पुणे - राज्यात गेल्या सतरा वर्षांपासून बंद पडलेल्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. राज्यातील बॅंका वगळता इतर सहकारी संस्थांना आर्थिक सहकार्य करून त्या बळकट करण्याचा मार्ग यामुळे खुला झाला आहे. 

सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ स्थापन करण्यात आले होते. मात्र, गेल्या सतरा वर्षांपासून त्याचा कारभार बंद पडला होता. त्याच्या सर्वसाधारण सभाही झाल्या नव्हत्या. याची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. त्यात या महामंडळाच्या अध्यक्षपदी सहकारी मंत्री सुभाष देशमुख यांची, तर संचालक म्हणून आठ सदस्यांची नेमणूक झाली आहे. त्यामध्ये अर्थमंत्री, सहकार आयुक्त, साखर आयुक्त, पणन संचालक, तसेच दोन तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. सहकारी संस्थेचे सहनिबंधक हे या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असतील, अशी रचना करण्यात आली आहे. 

देशमुख म्हणाले, ""तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हे महामंडळ स्थापन केले होते. त्यानंतर एकदाही या महामंडळाची सर्वसाधारण सभा झाली नाही. त्याची पहिली सर्वसाधारण सभा आज झाली. या महामंडळाची नोंद आता कंपनी निबंधकांकडे केली आहे. संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता महामंडळातर्फे राज्यातील विविध सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी आणि कार्पोरेट क्षेत्राची मदतही घेण्यात येणार आहे.'' 

विदर्भातील भातगिरण्यांमध्ये 60 ते 65 वर्षांपूर्वीची जुनी यंत्रसामग्री आहे. अर्थसाह्य करून त्यांना बळकट करण्याचे प्रस्तावित आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. या महामंडळाच्या चालू वर्षापर्यंतच्या सर्वसाधारण सभा घ्याव्या लागणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात बंद असलेल्या 40 सहकारी साखर कारखान्यांपैकी दोन सुरू झाले असून अजून दहा कारखाने सुरू होणार आहेत.''

Web Title: marathi news pune news subhash deshmukh