अभ्यासाच्या जोडीला तंत्रज्ञानाच्या वापरातून यश : सुधीर ठाकरे

Pune News Use of Technology Sudhir Thakare
Pune News Use of Technology Sudhir Thakare

पुणे : "राज्य लोकसेवा आयोग हे एक प्रकारचे इन्स्टिट्यूशन आहे. आज या परीक्षेत अनेक आव्हाने आणि संधीही आहेत. त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवून आपण परीक्षेला सामोरे जायला पाहिजे. काळानुरूप अभ्यासाच्या पद्धतीत बदल करून डिजिटल माध्यमांचाही पुरेपूर वापर करावा. पारंपरिक अभ्यास पद्धतीच्या जोडीला तंत्रज्ञानाचा उपयोग करत गेलात तर यश नक्कीच मिळेल,'' असा गुरुमंत्र शनिवारी राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि माजी सनदी अधिकारी सुधीर ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी "सकाळ विद्या' आणि "शिवनेरी फाउंडेशन'ने आयोजिलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. "स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्याच प्रयत्नात राज्य सेवा पूर्वपरीक्षा कशी उत्तीर्ण करावी' या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच फाउंडेशनने विद्यार्थ्यांसाठी निर्मिलेल्या डिजिटल तंत्र साहित्याचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कणसे आणि शिवनेरी एमपीएससी ऍकॅडमीचे अध्यक्ष प्रा. सुहास कोकाटे या वेळी उपस्थित होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांची "मॉक टेस्ट'ही घेण्यात आली. 

ठाकरे म्हणाले, ""प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात कसे उतरेल यासाठी झटताना अभ्यासात सातत्य हवे. आज पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. परीक्षेत मोठी आव्हाने आहेत. दरवर्षी 5 हजार जागांसाठी 15 लाख विद्यार्थी परीक्षा देत असून, प्रत्येकाला यशस्वी व्हायचे आहे. त्यामुळे त्याचा अभ्यासही करायला हवा. पदवीचा अभ्यास करतानाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी संपूर्ण माहिती दिली पाहिजे. अभ्यासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासह त्यात नेहमी बदल करावा. लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक पावले उचलली आहेत. त्यांच्यासाठी परीक्षेत अनेक बदलही केले आहेत. आयोगात भ्रष्टाचार सुरू आहे हा न्यूनगंड बाजूला सारून विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे.'' 

डॉ. कणसे म्हणाले, ""डिजिटल माध्यमाच्या साह्याने अभ्यास कसा करता येईल यासाठी साहित्याची निर्मिती केली आहे. डिजिटल साहित्यातून विद्यार्थ्यांना योग्यरीत्या अभ्यास करता येईल. प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि जगातील संपूर्ण माहिती त्यात उपलब्ध आहे. तज्ज्ञांची व्याख्याने आणि नोट्‌स डिजिटल स्वरूपात उपलब्ध केली आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओच्या रूपातही ती उपलब्ध असून, विद्यार्थ्यांसाठी आम्ही यू-ट्यूब चॅनेलही काढले आहे.'' 

प्रा. सुहास कोकाटे म्हणाले, ""अभ्यास करा करावा हा प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात असतो. तर पदवीच्या पहिल्या वर्षापासून हा अभ्यास सुरू करायला हवा. त्यासोबतच डिजिटल माध्यमाचा अधिकाधिक वापर करावा. विद्यार्थ्यांसाठी आम्ही पेनड्राइव्ह आणि मायक्रो एसडी कार्ड उपलब्ध करून दिले आहे. ग्रामीण भागातील वा नोकरी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी यांना याचा उपयोग करता येईल. व्याख्यानांसह त्यात 2700 पानांच्या नोट्‌स वाचता येतील.'' रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com