नृत्यसंरचनेचं आव्हान पेलताना

नीला शर्मा
रविवार, 4 मार्च 2018

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (8 मार्च) निरनिराळ्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची ओळख आजपासून... 

ऋजुता सोमण ही सध्याची आघाडीची कथक नृत्यांगना व कोरिओग्राफर. अर्थपूर्ण नृत्यसंरचनांच्या निर्मितीमागचं तिचं हे चिंतन मुद्दाम लक्षात घ्यावं असंच आहे. 

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (8 मार्च) निरनिराळ्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची ओळख आजपासून... 

ऋजुता सोमण ही सध्याची आघाडीची कथक नृत्यांगना व कोरिओग्राफर. अर्थपूर्ण नृत्यसंरचनांच्या निर्मितीमागचं तिचं हे चिंतन मुद्दाम लक्षात घ्यावं असंच आहे. 

कोरिओग्राफी (नृत्यसंरचना) हा शब्द सध्या खूप ऐकायला मिळतो. मात्र, वाटतं तेवढं हे काम सोपं नाही. नुसत्याच हालचालींचे तुकडे एकामागोमाग जोडणं म्हणजे कोरिओग्राफी नाही. सुसंगत, अर्थवाही, सौंदर्यपूर्ण, विषय व आशयातील भाव नेमकेपणानं आटोपशीरपणे पोचविणारी, कसरत न वाटता प्रत्येक हालचालीमागं अचूक कारण असणारी, सामान्य प्रेक्षकांपासून ते अभिजात कलेच्या अभ्यासकांपर्यंत सगळ्यांना भावणारी, लहान-मोठ्या सर्वांना आपलीशी वाटणारी एकल, युगल किंवा सामूहिक नृत्यसंरचना करणं एवढं सगळं 'कोरिओग्राफी' या शब्दात सामावलेलं आहे. ऋजुता सोमण ही आघाडीची तरुण कथक नृत्यांगना हे सारं अभ्यासूपणे करते. तिनं केलेल्या कोरिओग्राफीचा पाया तर्कावर आधारलेला, तरीही भावपूर्ण व मनात रेंगाळणारा असतो. 

ऋजुता म्हणाली, ''कथकमधल्या दीपस्तंभ म्हणावं अशा पंडिता रोहिणी भाटे यांची मी शिष्या. त्यांच्याकडून मिळालेली जीवनमूल्यं घेऊन 20 वर्षांहून जास्त काळ कथक नृत्याचा पारंपरिक वारसा जपते आहे. काळानुरूप परिवर्तन साधत नवे आविष्कार करते आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या वयाच्या स्त्री-पुरुषांनाही मोजक्‍या वेळेत, खिळवून ठेवत निरनिराळे विषय मांडणं, ही आजच्या काळाची गरज आहे. कथक नृत्य म्हणजेच मुळात नृत्यातून एखादी कथा सांगणं. ही शैली एवढी विस्तारक्षम आहे की, सध्याच्या फ्युजनमध्येही ती बेमालूम आपलीशी होऊन जाते.'' 

ऋजुतानं असंही सांगितलं की, हल्ली कॉर्पोरेट संस्कृतीत एखाद्या उत्पादनाची ओळख जनसमुदायाला करून देण्यासाठीही कित्येकदा कोरिओग्राफी करायची असते. ते आव्हान असतं. सवंगपणा येऊ न देता, कलेतल्या मधुर अभिव्यक्तीच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडणं यासाठी खूप अभ्यास, चिंतन, कल्पकता आणि कौशल्याची गरज असते. मुंबईतल्या 'सेवासदन' संस्थेतल्या वंचित मुलींसाठी दहा वर्षे मी तऱ्हेतऱ्हेच्या 'थीम'वर नृत्य बसवत आले आहे. वस्ती पातळीवरच्या त्या मुलींमध्ये या आविष्कारामुळे नवी ऊर्जा भरली जाते. शास्त्रीय नृत्याची कुठलीच माहिती नसतानाही हे नवं कौशल्य त्यांना आत्मविश्‍वास देऊन जातं. मध्यंतरी स्किझोफ्रेनियाचे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, उपचार करणारे व कार्यकर्त्यांसाठी मी 'चैतन्य' हे सादरीकरण केलं. याचा उपयोग मनाची अस्वस्थता, दुभंगपणा दूर सारत आनंद, एकसंधपणा यासाठी करायचा आहे, हे भान ठेवून मी तशा हालचालींचे गोफ विणले. तसंच संगीत निवडलं. 

'राजहंस' हे नृत्यनाट्य ऋजुतानं रंगमंचावर आणलं होतं. त्याबद्दल ती म्हणाली, ''कृष्णहंसाचं रूपक वापरून अंतरीच्या सकारात्मक बदलांची कथा मांडण्यासाठी मी आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान वापरलं. आरशात स्वतःला पाहणं हे दाखवण्यासाठी काही भाग आधी चित्रित करून तो मागच्या बाजूच्या पडद्यावर झळकवला. प्रकाश व ध्वनीचा वापर झगमगापलीकडे जाऊन आशयघनता वाढवण्यासाठी केला. यापूर्वी कुसुमाग्रजांची 'वीज' व पु. शि. रेग्यांची 'रेषा' या छोट्या मराठी कविता 'कनुप्रिया' हे डॉ. धर्मवीर भारतीय यांचं हिंदीतलं खंडकाव्य तसंच श्‍याम मनोहरलिखित 'दर्शन' हे वास्तववादी नृत्यनाट्य असो, या संरचनांमध्ये शब्द आणि शब्दांपलीकडचं पोचवण्यासाठी विचार केलेला होता. अशा विविध कलाकृतींसाठी गरजेनुसार कथकमधील गतभाव, गतनिकास, हस्तकं, मुद्रा आदी अंगभाषा वापरत कलाकार देह-मनाचा समन्वय साधणं, कलाकार व प्रेक्षकांना एकात्म करणारी नृत्य संरचना बांधणं, हा ध्यास ऋजुताला जडला आहे. तिच्या 'ऋजुता सोमण कल्चरल डान्स ऍकॅडमी'च्या माध्यमातून कथक व योगाचा संगम अनुभवणारेही अनेकजण आहेत.

Web Title: marathi news pune news Womens Day