शहरातील साहित्यिकांनी मराठी भाषा संवर्धन समितीला ऊर्जितावस्था देण्याची वर्तवली गरज 

दीपेश सुराणा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी भर देण्याची अपेक्षा शहरातील साहित्यिकांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी आवश्‍यक पुढाकार घेण्याची तयारी देखील त्यांनी दर्शविली आहे. 

पिंपरी -  महापालिकेने मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी स्थापन केलेल्या मराठी भाषा संवर्धन समितीला ऊर्जितावस्था देण्याची गरज आहे. या समितीचे पुनर्गठन करून त्याच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी भर देण्याची अपेक्षा शहरातील साहित्यिकांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी आवश्‍यक पुढाकार घेण्याची तयारी देखील त्यांनी दर्शविली आहे. 

मराठी भाषा संवर्धन समिती कामकाजाबाबत सद्य:स्थिती : 
* पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरीतही समितीची स्थापना. 
* स्थायी समिती सभेत 6 सप्टेंबर 2016 ला सदस्य पारित ठराव संमत.
* समितीच्या कामकाजाबाबत शासनाकडून माहिती घेऊन नियोजन करण्याची गरज.
तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची भूमिका. 
* निवडणूक आचारसंहिता व समितीत राजकीय पदाधिकारी घेण्याची 
मागणी वाढल्याने समितीच्या कामाला खोडा.
* दीड वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही समितीच्या बैठका आणि कामकाजाला मुहूर्ताची प्रतीक्षा. 

महाराष्ट्र साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड) चे अध्यक्ष राजन लाखे सांगतात, 
मराठी भाषा संवर्धन समितीचे काम लवकरात लवकर सुरू व्हायला हवे. महाराष्ट्र साहित्य परिषद ही भाषेच्या स्तरावर कार्य करीत आहे. महापालिकेत समिती स्थापन झाल्यानंतर अद्यापपर्यंत कोणतीही बैठक झालेली नाही. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला संपर्क साधल्यास आम्ही या समितीच्या माध्यमातून आवश्‍यक कामकाज करण्यासाठी पाठपुरावा करू शकतो. महापालिकेने मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने हे काम सुरू करावे, अशी अपेक्षा आहे. 

समितीचे समन्वय सदस्य अरुण बोऱ्हाडे सांगतात, 
तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी मराठी भाषा संवर्धन समितीचे कामकाज कसे करायचे, याची माहिती शासनाकडून घेऊन त्यानुसार पुढील दिशा ठरविण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर निवडणूक आचारसंहिता व अन्य काही कारणांमुळे या समितीचे काम स्थगित राहिले. महापालिका पदाधिकाऱ्यांना भेटून संबंधित समितीचे कामकाज सुरू करण्याची मागणी केली आहे. शहरातील साहित्यिकांनी महापौर, आयुक्त यांची एकत्रितपणे भेट घेतल्यास याबाबत तोडगा निघू शकेल. 

समिती सदस्य डॉ. राजेंद्र कांकरिया सांगतात, महापालिकेतील सत्ता बदलली असली तरी समितीची बैठक आणि कामकाज सुरू व्हायला हवे. त्यासाठी समितीची प्राथमिक बैठक महापालिका प्रशासनाने बोलवावी. या समितीत साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना सामावून घ्यावे. महापालिकेने संबंधित समितीची बैठक लावल्यास त्यामध्ये सदस्य आवश्‍यक योगदान निश्‍चितपणे देतील. शुद्धलेखन, बोलीभाषेमध्ये सुधारणा, शासकीय भाषेत सोपेपणा आणणे, विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे आदी बाबी या समितीच्या माध्यमातून शक्‍य आहे. 

कवी प्रतिनिधी राज अहेरराव सांगतात, दीड वर्षापूर्वी स्थापन झालेल्या मराठी भाषा संवर्धन समितीचे कामकाज अद्यापपर्यंत सुरू झालेले नाही. ते लवकरात लवकर सुरू व्हायला हवे. महापालिकेने शहरातील साहित्यिकांसाठी पुण्यातील सुदर्शन रंगमंचाच्या धर्तीवर छोटे सभागृह उभारावे. त्यामध्ये मराठी भाषा साहित्यविषयक चळवळ सुरू करता येईल. त्याशिवाय, महापालिकेच्या वाचनालयासाठी स्थानिक कवींचे किमान 100 काव्यसंग्रह विकत घ्यायला हवे. मराठी भाषेसाठी काम करणारे साहित्यिक आणि मंडळांची सूची बनवावी. 

समिती सदस्य राजेंद्र घावटे सांगतात, पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थापन केलेल्या मराठी भाषा संवर्धन समितीचे कामकाज लवकरात लवकर सुरू व्हायला हवे. त्यासाठी असलेली उदासीनता घालविली पाहिजे. समितीचे पुनर्गठन होणे आवश्‍यक आहे. संबंधित समितीचे वेगळे स्थान असायला हवे. महापालिकेच्या क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समितीशी त्याचा संबंध जोडू नये. शहर कॉस्मोपॉलिटिन होत असताना मराठी भाषेच्या बाबतीत विचारमंथन होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्‍यक पाठपुरावा महापालिकेकडून होणे गरजेचे आहे. 

मराठी भाषेचे अभ्यासक धनंजय भिसे सांगतात, महापालिकेत दीड वर्षापूर्वी मराठी भाषा संवर्धन समिती गठित झाली. मात्र, त्यानंतर संबंधित समितीची कोणतीही बैठक झाली नाही. महापालिका प्रशासन व पदाधिकारी मराठी भाषेच्या संदर्भात उदासीन असल्याचे चित्र त्यामुळे पुढे येत आहे. मात्र, आता याबाबतची उदासीनता घालवून समितीची बैठक व कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आवश्‍यक प्रयत्न तत्काळ सुरू व्हायला हवे. 

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील मत व्यक्तं केले, "महापालिकेत स्थापन झालेल्या मराठी भाषा संवर्धन समितीचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी त्या समितीची तातडीने बैठक घेतली जाईल. समितीच्या कामाबाबत आवश्‍यक ठराव केला जाईल. समितीचे काम सुरू करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर आवश्‍यक नियोजन ठरविले जाईल.'' 

Web Title: marathi news pune pimpri marathi bhasha din literature