विकासासाठी तरुणांनी समाजकार्यात यावे - प्रतापराव पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे - पुणे हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. पुण्याने अनेक सामाजिक कार्यकर्ते निर्माण केले आहेत. डॉ. बाबा आढाव आणि डॉ. विनोद शहा यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रेरणा घेऊन तरुण पिढीनेही सामाजिक कार्यात यायला हवे. क्षेत्र बदलते तसा संघर्षही करावा लागतो; पण धैर्य असेल तर शिखर गाठता येते. म्हणून समाजभान निर्माण करून देशाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी अधिकाधिक तरुणांनी स्फूर्ती घेऊन समाजकार्यात यावे, असे आवाहन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शुक्रवारी केले. 

पुणे - पुणे हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. पुण्याने अनेक सामाजिक कार्यकर्ते निर्माण केले आहेत. डॉ. बाबा आढाव आणि डॉ. विनोद शहा यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रेरणा घेऊन तरुण पिढीनेही सामाजिक कार्यात यायला हवे. क्षेत्र बदलते तसा संघर्षही करावा लागतो; पण धैर्य असेल तर शिखर गाठता येते. म्हणून समाजभान निर्माण करून देशाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी अधिकाधिक तरुणांनी स्फूर्ती घेऊन समाजकार्यात यावे, असे आवाहन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शुक्रवारी केले. 

‘महाराष्ट्र आरोग्य मंडळा’तर्फे डॉ. सि. तु. (दादासाहेब) गुजर स्मृती पुरस्काराचे वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना; तर आरोग्य क्षेत्रातील कार्याबद्दल जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एफ. पाटील, उपाध्यक्ष सतीश अगरवाल, सचिव अनिल गुजर, डॉ. सुदाम काटे, आढाव यांच्या पत्नी शीला आढाव आणि शहा यांच्या पत्नी मीना शहा आदी या वेळी उपस्थित होते. 

डॉ. आढाव आणि डॉ. शहा यांनी पुरस्काराची ५१ हजार रुपयांची रक्कम मंडळाकडे सुपूर्त केली. साने गुरुजी रुग्णालयास ‘नॅशनल ॲक्रिडीटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हाइडर्स’चे (एनएबीएच) प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल रुग्णालयातील डॉक्‍टरांचा सत्कार करण्यात आला; तर डॉ. काटे यांना सिकलसेल ॲनिमिया आजारावरील संशोधनासाठी ‘अमेरिकन सिकलसेल सोसायटी’द्वारे मिळालेल्या ‘ॲडव्होकेट ऑफ सिकलसेल २०१७’ पुरस्काराबद्दल त्यांना गौरविले. 

पवार म्हणाले, ‘‘माझा आणि दादा गुजर यांचा सहवास सुमारे ३० वर्षे होता. बालग्राम संस्थेसाठी आम्ही एकत्र काम केले. समाजात त्यांच्यासारखी निःस्वार्थी आणि प्रामाणिक माणसं कमी भेटतील. त्यांनी आपल्या कामातून एक जाणीव आणि प्रेरणा निर्माण दिली. समाजसेवेसाठी आर्थिक अडचणही येतात; पण क्षमता असेल तर यश नक्कीच मिळते. आज सामाजिक संस्थांना अनेक दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळत आहे. असे अनेक हात समाजात निर्माण व्हायला हवेत. त्यातून अनेकांचे आयुष्य उजळेल आणि समाज पुढे जाऊ शकेल. संपत्ती निर्माण करण्यापेक्षा ती टिकवावी कशी, हा ताण आज वाढतोय. या परिस्थितीत समाजात दानशूर उद्योजक आणि लोक कसे निर्माण होतील हे पाहिले पाहिजे.’’ 

डॉ. चंदनवाले म्हणाले, ‘‘ससून रुग्णालय हे गोरगरिबांसह मध्यमवर्गीयांचेही रुग्णालय आहे. रुग्णालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. रुग्ण हे आमच्यासाठी दैवत आहेच; पण त्यांच्यासोबत एक ऋणानुबंध कसे निर्माण करता येईल याचा प्रयत्न करतोय.’’ 

डॉ. आढाव म्हणाले, ‘‘वैद्यकीय क्षेत्रातील नवोदित डॉक्‍टरांनीही प्रामाणिकपणे दादा गुजर यांच्यासारखी सेवा बजवावी. आज शोषण वाढतेय. ७० टक्के संपत्ती अवघ्या १ टक्के लोकांकडे आहे. याच फरकामुळे मूल्यांच्या पातळीवर आम्ही वंचित आहोत. समाजाला मूल्याधिष्ठित चारित्र्य असलेल्या व्यक्तींची आवश्‍यकता आहे.’’ 

डॉ. शहा म्हणाले, ‘‘मी दादा गुजर यांच्याकडून सामाजिक कार्याची प्रेरणा घेतली. ते समाजकार्यातील वटवृक्ष होते आणि आदर्श होते. ते सदैव सर्वांच्या लक्षात राहतील. खऱ्या अर्थाने जीवन त्यांना कळाले होते.’’ 

Web Title: marathi news pune youth should come to social work for development