राजू शेट्टी यांनी सुरवात केली पण शेवट मी करणार आहे- सदाभाऊ खोत

sadabhau Khot
sadabhau Khot

दौंड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला तर हातकणंगले (जि. कोल्हापूर) लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवेन. मतदारसंघाला बहुजन समाजाचा खासदार हवा आहे व वेळ पडल्यास राजू शेट्टी व सदाभाऊ खोत अशी लढत होईल. राजू शेट्टी यांनी सुरवात केली पण शेवट मी करणार आहे. खासदार राजू शेट्टी यांनी सतत बहुजन समाजाचा वापर व अपमान केल्याने त्या अपमानाचा बदला हातकणंगलेची जनता नक्की घेईन, असा विश्वास राज्याचे कृषी, फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.  

दौंड शहरात भाजप नेते वासुदेव काळे यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाला भेट दिल्यानंतर आज (ता. २५) दुपारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "खासदार राजू शेट्टी यांच्यापेक्षा माझा शेतकरी चळवळीचा इतिहास जास्त आहे. माझी औकात तपासण्याची त्यांची लायकी नाही. त्यांची लढाई सरकारविरूध्द नसून माझ्याविरूध्द आहे. त्यांची भाषा पाहिल्यानंतर ते वैफल्यग्रस्त झाल्याचे जाणवत आहे. स्वतःच्या राजकारणासाठी त्यांनी बहुजन समाजाचा वापर केला. बहुजन समाज राजू शेट्टी यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही व आम्ही देखील गप्प बसणार नाही. आम्हाला उशिरा कळाले की ते लबाड व ढोंगी आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून प्रबळ विरोध दिसू लागल्याने शेतकऱ्यांच्या नावाखाली त्यांची खासदारकी वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे.

खासदार शेट्टी यांच्यावर टीका करताना ते  म्हणाले,  "माझ्यावरील मंत्रीपदाची जबाबदारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावरील विश्वास हे श्री. शेट्टी यांच्या संतापाचे कारण आहे. त्यांनी शेतकरी चळवळ आत्मकेंद्रित केली असून त्यांना कोणाचेही मोठेपण सहन होत नाही. मला राजू शेट्टी यांनी मंत्री केलेले नाही, चळवळीत ३० वर्षे योगदान दिले म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळत मला मंत्री केलेले आहे. राजू शेट्टी यांनी जिल्ह्यात अन्य मंत्र्यांना अडविले नाही किंवा जाब विचारला नाही पण मला जालना व सोलापूर जिल्ह्यात मूठभर कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात शेतकरी आंदोलनात ज्यांच्यामुळे तरूण शेतकऱ्यांचा आंदोलनात बळी गेला त्यांच्याशी(राष्ट्रवादी काँग्रेस) श्री. शेट्टी हातमिळवणी करीत असून ते दुर्देवी आहे."

शेतकरी संघटनेच्या झालेल्या शकलांविषयी विचारले असता ते म्हणाले, "शरद जोशी यांची चळवळ समाज व शेतकरी केंद्रित होती. संघटना व्यक्तीकेंद्रित होऊ लागल्याने रघुनाथ पाटील, उल्हास पाटील, आदींसह कार्यकर्त्यांनी संघटना सोडली. राज्यातील शेतकरी सक्षम असून त्यास नेतृत्वाची गरज नाही हे पुणतांबा (जि.नगर) येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाने दाखवून दिलेले आहे."

दिल्लीत मूजरा व गल्लीत गजरा....
खासदार राजू शेट्टी यांच्याकडून लोकसभेत प्रश्न मांडण्याएेवजी गल्लीत येऊन प्रश्न कायम असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रकार म्हणजे दिल्लीत मूजरा व गल्लीत गजरा घालून हिंडायचा प्रकार असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com