दंगलीमागे मराठा संघटनांचाही हात : रामदास आठवलेंचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

सांगली : भीमा-कोरेगाव येथील दंगलीमागे मराठा संघटनांपैकी काहींचा हात आहे, असा आरोप रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. 

सांगली : भीमा-कोरेगाव येथील दंगलीमागे मराठा संघटनांपैकी काहींचा हात आहे, असा आरोप रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. 

ते म्हणाले, "भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर सणसवाडी येथे जो हल्ला करण्यात आला त्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने समिती नियुक्त केली आहे. याप्रकरणात निष्पाप लोकांवर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. समितीने तत्काळ चौकशी पूर्ण करावी. दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा कट होता. दलितांना भडकावण्याचा प्रयत्न यातून केला गेला. दलित-मराठा समाजात भांडणे लावली तर फायदा मिळेल अशी काहींची भूमिका आहे. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी. वढू येथून मोर्चा निघून सणसवाडीत आल्यानंतर दगडफेक झाली. यामागे मराठा समाजातील संघटनांचा हात असण्याची शक्‍यता आहे.'' 

आठवले म्हणाले, "दंगलीनंतर दलित संघटनांनी बंद पुकारला. बंदमध्ये सरकारी प्रॉपर्टीचे नुकसान झाले. परंतू मराठा समाजावर कोणी दगड मारला नाही. दुकाने फोडली नाहीत. तसेच मराठा समाजाने देखील कोणता विरोध केला नाही. दंगलीनंतर ज्या केसेस दाखल झाल्या आहेत, त्या काढून घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या प्रकरणानंतर मराठा समाजाने कोणताही हल्ला केला नाही. महाराष्ट्रात ऐक्‍यासाठी प्रयत्न होतोय ही चांगली गोष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे. दोन्ही समाज एकत्र राहावेत. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे. पुन्हा असे प्रकार घडू नयेत असे आम्हाला वाटते.'' 

माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सुरेश दुधगावकर, सचिन सवाखंडे आदी यावेळी उपस्थित होते. 

भाजप-सेनेने एकत्र यावे
2019 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल. परंतू भाजप-सेनेने एकत्र यावे असे वाटते. दोन्ही पक्ष वेगळे होणे हिताचे नाही. दोघांना एकत्र करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न केले. भाजप-सेनेची दोस्ती अनेक वर्षाची आहे. भाजपने उध्दव ठाकरे यांचे म्हणणे ऐकावे. उध्दव यांच्या नाराजीबाबत वरिष्ठ पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी बोलण्याची गरज आहे. शिवसेनेचे 18 खासदार आहेत. त्यांना आणखी एक मंत्रीपद दिले पाहिजे. पुन्हा सत्ता आणताना नाराज करून चालणार नाही. तडजोड केली तर अडचण येणार नाही. विकासासाठी एकत्र यावे अशी आमची भूमिका आहे. केंद्रात व राज्यात शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे वाद मिटवावा. भाजपपासून घटक पक्ष बाजूला जाणार नाहीत. गुजरातमध्ये निवडणूक कठीण होती तरी सत्ता आली. 2019 च्या निवडणुकीत देखील नरेंद्र मोदींची हवा तशीच राहील. नीरव मोदीने केलेल्या भ्रष्टाचाराला कठोर विरोध राहील. त्याच्या भ्रष्टाचाराशी सरकारचा थेट संबंध नाही. घोटाळ्यामुळे बॅंकांना आचारसंहिता लावण्याची गरज आहे. 

आर्थिक आरक्षणाला विरोध
राज ठाकरे यांनी नुकतेच शरद पवार यांची मुलाखत घेतली. पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. आमचे चांगले मित्र आहेत. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे श्री. पवारांनी सांगितल्याचे वाचनात आले. परंतू आर्थिक निकषावरील आरक्षणाला आमचा विरोध आहे. श्री. पवारांनी जर तशी मागणी असेल तर ती घटनाविरोधी आहे. सामाजिक मागासलेपणावर आरक्षण दिले पाहिजे. जाती नष्ट केल्यातर आरक्षण सोडायला आम्ही तयार आहोत. जोपर्यंत जाती जीवंत आहेत, तोपर्यंत त्याआधारेच आरक्षण दिले पाहिजे. दलित, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आमची भूमिका आहे.

Web Title: marathi news Sangli News Koregaon Bhima ramdas athawale