साखर कारखानदारीप्रमाणे अंजीर व फळ प्रक्रियेचे कारखाने पुरंदरला निघतील : शरद पवार

sharad-pawar
sharad-pawar

सासवड (ता. पुरंदर) : टिकाऊ क्षमता व प्रक्रियेसाठी उपयुक्त असलेल्या अंजीर फळपिकाच्या जाती जगभरातून आणून पुरंदर व तत्सम तालुक्यांच्या शिवारातील अंजीर उत्पादन व क्षेत्र वाढविण्यात राज्य अंजीर संघाने पुढाकार घ्यावा. तसेच अंजीरात संशोधन वाढविताना क्षेत्र विस्तार केल्यास साखर कारखानदारीच्या तोडीचे अंजीर व इतर फळ प्रक्रियेचे कारखाने पुरंदरसारख्या भागात निघतील, असे माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक आणि संशाेधन संघाच्या वतीने अंजीर फळपिक बदलाचे तंत्र, संशाेधन व विकासार्थ संपूर्ण एकदिवसीय पहिल्या 'अंजीर परिषदे'चे आयाेजन आज रविवारी (ता. 28) काळेवाडी (ता. पुरंदर) येथे करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे होते. 

अंजीर राज्य संघाचे अध्यक्ष रविंद्र नवलाखा, उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर, सचिव सुरेश सस्ते, खजिनदार प्रदिप पोमण, कृषी परीषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, जालींदर कामठे, सभापती अतुल म्हस्के, अशोक टेकवडे, सुनिल बोरकर, दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, देवेंद्र ढगे, डाॅ. विक्रम कड, डाॅ. विकास खैरे, डाॅ. सुनिल लोहाटे, डाॅ. गणपत इधाते आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी अंजीर उत्पादनात नावलौकिक मिळविलेल्या शेतकऱयांचा 'अंजीर रत्न' पुरस्कार देऊन सत्कार झाला. तर पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छासह अंजीर पेटी देऊनच झाला.   

पवार म्हणाले, ''मी जसे चाळीस दिवसांनंतरच पाणी द्यावे लागते अशा ऊस जातीच्या पाहणीसाठी परदेशात जाणार आहे. त्याच पध्दतीने अंजीराची प्रक्रियायुक्त जात पाहण्यास तुर्कस्थानला जाणार आहे. माझी खात्री आहे की, तिथल्या मूल्य वाढविणाऱया जाती महाराष्ट्रात आल्या तर अंजीर उत्पादकांचा कायापालट होईल''.

यावेळी राज्यमंत्री शिवतारे म्हणाले, ''अंजीर संघाने पुढाकार घेतला. तसाच मी मंत्रिपातळीवर बैठकीसाठी पुढाकार घेतो. अंजीर फळपिकातील सर्व अडचणी, प्रश्न मांडा. ते आपण मुंबई व दिल्लीत जाऊन पाठपुराव्याने सोडवू. परदेशी वाण देशात आणताना अनेक जाचक अटी व नियम असतात, त्यासाठीच सरकारी पाठबळ लागते, ते मिळविण्यात मी पुढे असेल. 

यावेळी सुनिल बोरकर, सागर काळे, रविंद्र नवलाखा आदींनी मनोगते मांडली. प्रस्ताविक सुरेश सस्ते यांनी केले. सूत्रसंचालन संजय पोमण यांनी केले तर प्रदिप पोमण यांनी आभार मानले. 

पुरंदर विमानतळ भाग्य बदलणारे : पवार

पुरंदरच्या नियोजित विमानतळास विरोध करणाऱ्यांचे निवदेन मला मिळाले. पण पुरंदरचा विमानतळ प्रकल्प हा तालुक्याचे भाग्य बदलणारी संधी आहे. आता मला चाकण, खेडवाल्यांचे शिष्टमंडळ भेटत आहे. विमानतळ आमच्याकडे होऊ द्या, असे म्हणत आहे.

पण त्यांची संधी विरोधामुळे गेली. पुरंदरने ही संधी घालवू नये. तुमचे बागायती क्षेत्र वा जतन करायच्या बाबी आपण वाचविण्याचा प्रयत्न करु. यात तुम्हाला पर्यायी उत्पादनाची साधने सरकारकडून निर्माण करुन दिली जातील. त्यावर सुसंवादही होईल, हे लक्षात घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com