पुरणपोळी देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत अनोखे स्वागत

संतोष शेंडकर
गुरुवार, 15 जून 2017

सोमेश्वरनगर (पुणे) - बारामती तालुक्‍यातील चौधरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवागत विद्यार्थ्यांची ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरवणूक काढली. तर रंजना साबळे या आहार शिजविणाऱ्या महिलेने चक्क पुरणपोळीचे जेवण देत सर्व मुलांचा पहिला दिवस गोड केला. सोमेश्वर विद्यालयात 110 नवागतांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले तर सोरटेवाडी विद्यालयात मानसशास्त्रज्ञाचे व्याख्यान पार पडले.

सोमेश्वरनगर (पुणे) - बारामती तालुक्‍यातील चौधरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवागत विद्यार्थ्यांची ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरवणूक काढली. तर रंजना साबळे या आहार शिजविणाऱ्या महिलेने चक्क पुरणपोळीचे जेवण देत सर्व मुलांचा पहिला दिवस गोड केला. सोमेश्वर विद्यालयात 110 नवागतांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले तर सोरटेवाडी विद्यालयात मानसशास्त्रज्ञाचे व्याख्यान पार पडले.

चौधरवाडी येथे दत्तात्रेय चौधरी यांनी बैलगाडी उपलब्ध करून दिली. तर शिवतेज तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैलांची आणि बैलगाडीची आरास केली. बैलगाडीत नवागत बारा मुलांना बसवून गावातून मिरवणूक काढून शाळेत आणण्यात आले. मिरवणुकीत सरपंच अनिता दगडे, उपसरपंच दीपक पवार, माजी सरपंच यादवराव शिंदे, पोपटराव पवार, सुरेश पवार, तानाजी भापकर, मोहन चौधरी आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. यानंतर जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, केंद्रप्रमुख नवनाथ ओमासे यांच्या हस्ते नवागतांना वृक्षाचे रोप, पुस्तके व वह्या देऊन स्वागत करण्यात आले. पोषण आहार शिजविणाऱ्या रंजना दिनेश साबळे यांच्या वतीने सर्व मुलांना व उपस्थित ग्रामस्थांना पुरणपोळीचे गोड जेवण देण्यात आले.

करंजेपूल येथे दोन महिला पालक व केंद्रप्रमुख नवनाथ ओमासे, मुख्याध्यापिका इंदुमती वीरकर यांच्या हस्ते मुलांना पुस्तके व गुलाबपुष्प देऊन प्रवेशोत्सव करण्यात आला. शेंडकरवाडी जिल्हा परिषद शाळेत माजी सरपंच हनुमंत शेंडकर यांच्या हस्ते तर सोरटेवाडी जिल्हा परिषद शाळेत सरपंच सुनंदा ज्ञानदेव सोरटे यांच्या हस्ते नवागतांचे गुलाबपुष्प व पुस्तके देऊन स्वागत झाले. वाणेवाडी जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या प्रवेशद्वारात व आवारात फुग्यांची व रांगोळीची आरास करण्यात आली होती. सरपंच उषा चौगुले, उपसरपंच ललिता चव्हाण, मुख्याध्यापक नवनाथ कारंडे यांच्या हस्ते पहिलीत दाखल केलेल्या तीस मुलांचे स्वागत करण्यात आले. वाघळवाडी जिल्हा परिषद शाळा व सोमेश्वरनगर जिल्हा परिषद शाळा येथे सरपंच राजेंद्र काशवेद, माजी उपसरपंच गणेश जाधव, विजय तावरे मुलांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. कदमवस्ती जिल्हा परिषद शाळा व मुरूम जिल्हा परिषद शाळा येथे पंचायत समिती सदस्या नीता नारायण फरांदे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करत नवागतांचे स्वागत पार पडले. ओमासे यांनी दिवसभरात केंद्रातील सर्व सतरा शाळांना भेटी देत नवागतांना शुभेच्छा दिल्या.

सोमेश्वर विद्यालयात पाचवीमध्ये दाखल झालेल्या 110 मुलांचे बॅंडच्या तालावर वाजतगाजत स्वागत करण्यात आले. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, मुख्याध्यापक ए. व्ही. भोसले यांच्या हस्ते त्यांना पुस्तकवाटप करण्यात आले. तर यानिमित्ताने दहावी, बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सोरटेवाडी माध्यमिक विद्यालयात पहिल्याच दिवशी मुलांसाठी मानसशास्त्रज्ञ समीक्षा एस. एम. यांचे मार्गदर्शन ठेवले होते. कोऱ्हाळे खुर्द, कोऱ्हाळे बुद्रुक, होळ, चोपजड, कारंडेमळा, सदोबाचीवाडी या जिल्हा परिषद शाळांमधील नवागतांचे स्थलांतरित मुलांसाठी काम करणाऱ्या 'आशा' प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी खारका देऊन स्वागत केले.

Web Title: marathi news school news puranpoli new students school opens