दोघींचं हितगूज सांगणारी सखी बासरी

नीला शर्मा
बुधवार, 7 मार्च 2018

सुचिस्मिता व देवप्रिया चटर्जी या दोघी बहिणी बासरीवर रागदारी प्रस्तुत करतात तेव्हा श्रोते नवलाईनं ऐकत आणि बघत राहतात. देश-विदेशांतील मैफलींमध्ये त्यांच्या सहवादनाला दिलखुलास दाद मिळते.

श्रीकृष्णाच्या अधरांवरची बासरी भारतीय परंपरेतलं पुरातन वाद्य असलं, तरी त्यावर पुरुषांची मक्तेदारी दिसून येते. मात्र सुचिस्मिता व देवप्रिया चटर्जी या बहिणींनी हा पायंडा मोडत बासरीवादनातून शास्त्रीय संगीत सादर करत नवं पर्व सुरू केलं आहे. 

देवप्रिया म्हणाली, ‘‘आमचे बाबा (रॉबिन) आणि आई (कृष्णा) गायक असल्यानं संगीत अगदी बालपणापासून आमच्यात भिनलं आहे. बाबांना अभिजात बासरीवादक व्हायचं होतं; पण कामानिमित्त त्यांना अफगाणिस्तानमध्ये राहावं लागलं. अर्थातच आम्हीही त्यांच्याबरोबर तिथंच होतो. भारतात परतल्यावर त्यांनी आम्हा दोघींना बासरीवादनासाठी प्रोत्साहन दिलं. ते म्हणायचे, ‘महिलांनी बासरी वाजवायची नाही, असा नियम नाही. कदाचित दमसास टिकवायला त्या कमी पडतील असं वाटून बासरीकडे त्यांना वळता आलं नसेल; पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे.’ त्यामुळे पंडित भोलानाथ प्रसन्न, त्यानंतर पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडून आम्हाला शिक्षण घेता आलं. त्यांनीही आम्हाला पुरेपूर उत्तेजन दिलं. आज आम्ही बासरीवर सहवादन करतो. पुढच्या काळात कदाचित पुष्कळ जणी यात दिसतील.’’ 

सुचिस्मितानं सांगितलं, ‘‘पारंपरिक राग सादरीकरणाला आम्ही प्राधान्य देतोच; पण त्याला कॉस्मोपॉलिटन व कॉर्पोरेट कल्चरच्या श्रोत्यांना आवडण्याजोग्या, काळानुरूप बदलांचीही जोड दिली आहे. प्रत्येक ठिकाणी अभिजन वर्गच श्रोता म्हणून नसतो. इतरांनाही संगीताचा आस्वाद घेता यावा, यासाठी फ्युजनमध्ये आम्ही सहभागी होतो, मात्र शास्त्रीय बैठकीला धरूनच आमचे हे प्रयत्न सुरू असतात. सध्या संगीतालाही वैश्विक कोंदण मिळालं आहे. ते लक्षात घेऊन आम्ही दोघी नवे प्रयोग करू पाहतो. गतिमान जीवनशैलीमुळे आता पूर्वीसारखं बराच वेळ एकच राग ऐकणंही लोकांना शक्‍य नसतं. कमी वेळेत वैविध्य आवडणाऱ्या नव्या पिढीला थोडक्‍यात पण दमदार प्रस्तुती हवी असते. याचं भान सध्या ठेवावं लागतं.’’

देवप्रियानं आठवण सांगितली. ती म्हणाली, ‘‘लहानपणी आम्ही गाणं शिकायचो. बासरी वाजवली तर घशावर परिणाम होईल, अशी शंका कुणी व्यक्त केली तर बाबा म्हणायचे ‘करून पाहू.’ पण मला आणि दीदीला असं कधीच वाटलं नाही, की आम्ही काही तरी ‘हट के’ करत आहोत. लोकांनाच आमचं मुली असून बासरीवादन करणं जगावेगळं वाटलं. हे वेगळेपण आमच्या लक्षात फार नंतर आलं, पण ते आलं तेव्हा छान वाटलं. मग आम्ही बासरीवादनावर गंभीरतेनं लक्ष केंद्रित केलं. पार्श्वसंगीताच्या क्षेत्रात सहभागी होतानाही आपल्यावरची जबाबदारी वाढत चालल्याची जाणीव होती. अलाहाबादलाच आम्ही जन्मलो. अफगाणिस्तानहून इथंच परतलो. बासरीवादनासाठीच इथल्या प्रयाग संगीत समितीच्या पदवी परीक्षेत दीदीला सुवर्ण आणि मला रौप्यपदक मिळालं. नंतर पदव्युत्तर परीक्षेत याच्या उलट झालं, याची लोकांना फार मौज वाटते. मात्र माझ्यासाठी दीदीसुद्धा गुरू आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत अभिजात बासरीवादन उत्तम प्रकारे नेण्यासाठी आम्ही चर्चा करत असतो. या संबंधीच्या कार्यशाळांमधूनही आमचे विचार मांडत असतो.’’

सुचिस्मितानं स्पष्ट केलं, ‘‘अनेक जण म्हणतात, की सतार, सरोद वगैरेसारखी बासरी सुरात लावावी लागत नाही; पण खरी गोष्ट अशी आहे, बासरीऐवजी वादकाला स्वतःलाच सुरात स्थिर करावं लागतं. मर्यादित छिद्रांमधून तिन्ही सप्तकं अभिव्यक्त करायला कौशल्य लागतं, साधना लागते. यातलं तांत्रिक काम लोकांना दिसू शकत नाही. एवढीशी नाजूक दिसणारी बासरी, पण मंचावर प्रखर प्रकाश किंवा वाढलेल्या एसीमुळे तिच्या ट्युनिंगवर परिणाम होऊ शकतो. अशा प्रसंगी फुंक कशी वापरायची, यावर सारं काही अवलंबून असतं. गुरूंकडून पुष्कळ राग आम्ही शिकलो असलो, तरी बासरीवर हंसध्वनी, बागेश्री, यमन, झिंझोटी यांसारखे राग खुलतात. हे नव्या मैफलीत नव्यानं वाजवताना पूर्वीपेक्षा निराळे वाटावेत, यासाठी खूप तयारी लागते.’’ आई-बाबा आणि गुरूंच्या आशीर्वादानं आम्हाला लोकांकडून खूप कौतुक लाभतं, पण ही तर सुरवात आहे. अजून आम्हाला बरीच संगीत साधना करायची आहे.

Web Title: marathi news Suchismita Chatterjee Devapriya Chatterjee pune