'सनबर्न'च्या विरोधात शुक्रवारी लवळ्यात ग्रामसभेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील लवळे येथे होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून त्यासाठी शुक्रवारी (ता. १५) ग्रामसभेचे आयोजन केलेले आहे. येथील ग्रामपंचायतीला चुकीची माहिती देऊन आयोजकांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळविलेले आहे. या नाहरकत प्रमाणपत्राच्या आधारेच पुढील परवानग्या मिळाल्यामुळे हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने दिलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी शुक्रवारी ग्रामसभा आयोजित केलेली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील बावधन व लवळे गावाच्या सीमेवर गुरुवार दि. २८ ते रविवार दि. ३१ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे स्थानिकांत नाराजीचे वातावरण असून संस्कृतीवर घाला घालणारा हा कार्यक्रम होऊच नये, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. या कार्यक्रमाला विरोध म्हणून ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. याबाबत येथील ग्रामस्थ अॅड. अनिल शितोळे यांनी सांगितले की, सरपंचांना खोटी माहिती देऊन आयोजकांनी परवानगी मिळविलेली आहे. सर्व गावकऱ्यांचा या कार्यक्रमाला विरोध  आहे. सरपंचांनी ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी शुक्रवारी येथील रोटमलनाथ मंदिरात ग्रामसभेचे आयोजन केलेले आहे.

सरपंच विद्या क्षीरसागर म्हणाल्या, "आयोजकांना आम्ही ओळखत नसल्याने येथील ऑक्सफर्ड गोल्फने आमच्याकडे लेखी हमी देऊन परवानगी मागितली आहे. ऑक्सफर्डने परवानगी मागताना अर्जात नमुद केले आहे की, दि. २८ ते ३१ डिसेंबर दरम्यान येथील ऑक्सफर्ड रिसॅार्टमध्ये संगीताचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामुळे कोणतीही सांस्कृतिक अथवा पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. जर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास      ऑक्सफर्ड गोल्फ त्याला जबाबदार राहील. ही लेखी हमी देताना सनबर्नचा कोणताही उल्लेख केलेला नव्हता. केवळ संगीताचा कार्यक्रम असा उल्लेख होता. त्यामुळे अशी लेखी हमी दिल्यामुळे ग्रामपंचायतीने त्यांना परवानगी दिलेली आहे. मात्र असे असूनही ग्रामस्थांचा या कार्यक्रमाला विरोध असल्याने ग्रामसभेत सदरची परवानगी रद्द करणार आहोत."

Web Title: Marathi news sunburn festival opposed by local villagers