कंबोडियात मराठी विश्व साहित्य संमेलन

कंबोडियात मराठी  विश्व साहित्य संमेलन

पुणे - विश्व मराठी परिषद आयोजित नववे विश्व मराठी साहित्य संमेलन यंदा कंबोडिया येथील अंग्कोरवाट येथे 28 ऑगस्टला होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद "मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे' गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर हे भूषविणार आहेत, तर संमेलनाचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष नीलेश गायकवाड यांनी दिली. 

विश्व मराठी परिषद आणि शिवसंघ प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित केलेल्या 9व्या मराठी साहित्य संमेलनाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी डॉ. गो. बं. देगलूरकर, श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे उपस्थित होते. 

गायकवाड म्हणाले, ""यंदाच्या वर्षी "पुरातन स्थापत्यशास्त्र' हा साहित्य संमेलनाचा विषय असणार आहे. आजवर अंदमान, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, मॉरिशस, भूतान, इंडोनेशिया आणि दुबई येथे मराठी साहित्य संमेलने झाली; परंतु यंदाचे संमेलन हे संमेलनाच्या विषयाला अनुरूप अशा अंग्कोरवाट येथे आयोजित करण्याचे आम्ही ठरवले आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे हे साहित्य संमेलन देशविदेशांतील संवाद सुकर करण्यास मदत करेल.'' 

""आधुनिक युगात मराठीचा प्रचार आणि प्रसार जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी साहित्यिकांनी वेगवेगळ्या विषयांचे मराठीकरण कसे होईल यादृष्टीने काम करणे गरजेचे आहे. तसेच, इतर क्षेत्रातील मराठी लेखनाला साहित्याचा दर्जा मिळण्यासाठी आणि मराठी भाषा ही साहित्यिक पातळीवर मर्यादित न ठेवता ती व्यवहाराची भाषा बनविण्याच्या दृष्टीने संमेलन विषयकेंद्रित करण्याचा हा प्रयत्न आहे. या संमेलनाच्या निमित्ताने सर्व क्षेत्रांतील प्रतिभावंत, संशोधक, अभ्यासक, लेखक आणि कल्पक यांना संमेलनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे,'' असेही गायकवाड या वेळी बोलताना म्हणाले. 

मराठी साहित्यातील "पुरातन स्थापत्यशास्त्र' हा विषय अप्रत्यक्षरीत्या समोर येतो. परंतु स्थापत्यकलेचे साहित्यातील महत्त्व रसिकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने या वर्षीच्या साहित्य संमेलनासाठी कंबोडिया हे ठिकाण निवडले आहे. कंबोडियातील अंग्कोरवाट हे प्राचीन वैभवशाली मंदिर भारतीय स्थापत्यशास्त्राचा अजोड आणि अद्वितीय नमुना आहे. अशा ठिकाणी संमेलनाच्या विषयाशी केंद्रित राहून होणारे हे संमेलन नक्कीच जागतिक पातळीवर मराठीचा दर्जा उंचावणारे ठरेल. 
- नीलेश गायकवाड, विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com