Pune Market Yard : ‘त्या’ डमी अडत्यावर कायमस्वरूपी बंदी; नियम मोडल्यास कारवाईचा बाजार समितीचा इशारा

मार्केट यार्डातील फळबाजारात डमी अडत्याने शेतकऱ्याला मारहाण करण्याच्या प्रकरणाची पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने गंभीर दखल घेतली आहे.
‘त्या’ डमी अडत्यावर कायमस्वरूपी बंदी
‘त्या’ डमी अडत्यावर कायमस्वरूपी बंदीSakal

मार्केट यार्ड : मार्केट यार्डातील फळबाजारात डमी अडत्याने शेतकऱ्याला मारहाण करण्याच्या प्रकरणाची पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने गंभीर दखल घेतली आहे. डमी अडत्यावर बाजारात प्रवेश करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.

संबंधित गाळामालकाला नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास त्याचा परवाना काही दिवसांसाठी रद्द केला जाईल. दरम्यान, मारहाण झालेल्या शेतकऱ्यानेच तक्रार करण्यास नकार दिला आहे.

रविवारी करंजी (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथील शेतकरी आदिनाथ गायकवाड यांना डमी अडता सुरेश भोहिने याने मारहाण केली. या पार्श्वभूमीवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. संबंधित शेतकऱ्याने तक्रार दिल्यास पोलिस कारवाई होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आजपासून दंडात्मक कारवाई

दरम्यान, फळे व भाजीपाला विभागातील गाळ्यांवर डमी अडत्यांचा सुळसुळाट निर्माण झाल्याने उद्यापासून (ता. ५) बाजार समिती दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणार आहे. गाळ्यावर नियमबाह्य डमी अडते आढळल्यास कारवाई केली जाईल. काळभोर यांनी सांगितले की, ‘‘डमी अडत्यांमुळे बाजारात दिवसभर किरकोळ विक्री सुरू होती. डमी अडत्यांना आळा घालण्यासाठी एका गाळ्यावर दोन मदतनीस ठेवता येतील असा निर्णय बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतला होता. मात्र पुन्हा डमी अडत्यांची संख्या वाढल्याने कारवाई केली जाईल.’’

व्यापाऱ्यांना गाळ्यासमोरील १५ फूट जागेत माल लावण्याची परवानगी आहे, मात्र त्यापुढील जागेतही माल लावल्याचे अनेक गाळ्यांसमोर दिसून येते. आता याची दखल घेतली जाईल. नियम मोडल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल. पत्रकार परिषदेला उपसभापती सारिका हरगुडे, संचालक दत्तात्रय पायगुडे, संचालिका मनिषा हरपळे आदी उपस्थित होते.

संचालक मंडळामुळे बाजार समितीच्या निर्णयप्रक्रियेला गती आली आहे. शेतकरी हिताच्या व बाजार विकासाच्या धोरण आखणीला वेग आला आहे. त्यामुळे बाजारातील व्यवहारात पारदर्शकता आली असून शेतकऱ्यांसह बाजार घटकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण केले जात आहे.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची बाजार समिती आहे. बाजारात शेतकऱ्यांवर अन्याय झाला, तर त्यांना न्याय मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे अन्याय झाल्यास शेतकऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता बाजार समितीकडे तक्रार करावी. बाजार समिती कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे.

- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com