बाजार समित्यांमध्ये काळ्या पैशाची ‘धुलाई’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

कोट्यवधींची काळी माया राजरोस होते आहे पांढरी 

कोट्यवधींची काळी माया राजरोस होते आहे पांढरी 

पुणे - शेतकऱ्यांच्याच लुटीतून मिळालेला काळा पैसा शेतकऱ्यांच्याच हस्ते पांढरा करण्याचा गोरखधंदा राज्यातील काही बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. आठ नोव्हेंबरनंतर पेट्रोलपंप, रेल्वेसेवा, स्थानिक स्वराज्य संस्था आदी वगळता अन्यत्र पाचशे व एक हजारच्या नोटा चालवण्यास बंदी घातलेली असतानाही शेतकऱ्याच्या असहायतेचा फायदा घेऊन त्याला शेतीमालाच्या विक्रीचे पैसे राजरोसपणे जुन्या चलनी नोटांमध्ये दिले जात आहेत. त्यातून कोट्यवधींची काळी माया गोरी बनवली जात आहे. जनधन खात्यांची चाैकशी करण्याचा पवित्रा घेणाऱ्या सरकारचे लक्ष बाजार समित्यांमधील या धुलाईकडे का जात नाही, असा प्रश्न कृषी क्षेत्रातून विचारला जात आहे.  

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर बऱ्याच बाजार समित्यांमध्ये सर्रास शेतीमालाच्या खरेदीसाठी या नोटांचा वापर केला जात आहे. हे पैसे घ्या किंवा चेक घ्या, असा पर्याय शेतकऱ्यांना दिला जात आहे. काही ठिकाणी नंतर पैसे देण्याचा वायदा केला जात आहे. 

एरवी वेळेत पट्टी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पुढच्या खरेदीचे ॲडव्हान्स पैसे देण्याचीही दानत दाखवण्यास सुरवात केली आहे.

व्यापाऱ्यांचे हे अचानक उफाळलेले शेतकरी प्रेम साठवलेली काळी माया पांढरी करण्यासाठीच आहे, हे शेतकऱ्यांच्याही लक्षात येत आहे. या जुन्या नोटा घेऊन त्या बदलण्यासाठी त्याला पुन्हा बॅंकेच्या दारात उभे राहावे लागत आहे. अशा रीतीने व्यापाऱ्याने दाबलेला पैसा परभारेच शेतकऱ्याच्या हस्ते पांढरा होतो आहे.

सरकार काही दिवसांचा वेळ मागून केवळ तमाशा पाहत असेल, तर सामान्यांनी करावं काय?
- समाधान बागवे, नागपूर.

गेल्या वर्षी ५०० ते ६०० रुपयांना कॅरेट होतं. सध्या ७० ते ११० रुपयांपर्यंत भाव आहेत.
- अरुण दांडगे, वरूडकाजी, जि. औरंगाबाद.

समोर आलेले मुद्दे...
नव्या चलनासाठी व्यापाऱ्यांची मनधरणी
किरकोळ विक्री आणि वाहतूक खर्चच मिळतो रोखीने
नव्या चलनासाठी भावात खावे लागते नुकसान
चेक वटल्यानंतरही गरजेसाठी पैसे उपलब्ध नाहीत
बाजार समित्यांतील बॅंकाही निरुत्तर
खेडा खरेदीत जुन्या नोटांसाठी अडवणूक
सुट्या पैशांची चणचण वाढली
दर ३० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत खाली

पुण्यात ‘ओल्याबरोबर सुके’
पुणे - नव्याबरोबर जुन्या नोटांही दिल्या जात आहेत. नव्या नोटा मागितल्यातर शेतमाल विक्रीस अडथळा

मुंबईत ‘जुन्यां’चा प्रभाव सुरळीत
मुंबई : काही व्यवहारांत मोठ्या प्रमाणात जुन्या नोटांचा वापर; व्यवहरांत सर्व ‘सुरळीत’ असल्याचा बाजार समितीचा दावा

‘खेडा’चा येथे खोडा
अकोला : खेडा खरेदीत जुन्या नोटांसाठी व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांवर दबाव, बॅंकेतून मिळणारी रक्कम खूपच कमी

कळमणाला दरात फटका
नागपूर : नव्या नोटांसाठी कमी दर, शेतकऱ्यांची अडवणूक. बाजार समितीतील बॅंकाही चलन तुटवड्याने निरुत्तर

कोल्हापुरात शेतकरी हताश
कोल्हापूर : येथे बाजार समितीत सुट्या पैशांची मोठी चणचण; दर ५० टक्‍क्‍यांहून खाली आल्याने शेतकरी हताश

परभणीत आवकेत घट
परभणी : काही व्यवहारांत लिलाव वेगळा, दर वेगळा; वाहतूक खर्चापुरतेच चलन दिले जाते. आवकेत २५ टक्के घट

औरंगाबादला दरावर परिणाम
औरंगाबाद : दरात मोठी घसरण; भाजीपाला बाजारात रोखीचे व्यवहार, एकूण व्यवहारांच्या प्रमाणात झाली घट

नाशिकला जुन्याच नोटा !
नाशिक - बाजारात दर तर निम्म्याने पडले आहेतच; पण व्यवहारही जुन्याच नोटांनी सुरू आहे. सुट्यांचीही चणचण

बाजारपेठेत नोटा नाहीत, नगदी पैसे मागितले, तर भाव पाडून मागतात,
- बापूराव वाळवटे, दामपुरी, ता. परभणी

नोटाबंदीचे नाव करत निम्म्याने दर पाडलेत अन्‌ जुन्याच नोटा खपवताहेत,
- मोतीलाल चौधरी, नळवाडे पाडे, ता. दिंडोरी

Web Title: Market committees in black money washing