राज्यातील बाजार समित्या उद्या राहणार बंद, कारण...

मिलिंद संगई
Thursday, 20 August 2020

केंद्र शासनाने जारी केलेल्या अध्यादेशाच्या निषेधार्थ राज्यातील बाजार समित्यांचे कामकाज शुक्रवारी (ता. 21) एक दिवसासाठी बंद राहणार आहे.

बारामती : केंद्र शासनाने जारी केलेल्या अध्यादेशाच्या निषेधार्थ राज्यातील बाजार समित्यांचे कामकाज शुक्रवारी (ता. 21) एक दिवसासाठी बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीही या बंदमध्ये सहभागी होणार आहे. 

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाबत 5 जून 2020 रोजी काढलेल्या अध्यादेशामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊन बाजार समिती कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने या धोरणाच्या निषेधार्थ हा एक दिवसाचा बंद पाळला जाणार असल्याची माहिती राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष दिलीप ढेबरे व बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे व सचिव अरविंद जगताप यांनी दिली. 

राज्यातील 307 बाजार समित्यांपैकी 301 बाजार समित्या या राज्यस्तरीय संघाच्या सदस्य आहेत. केंद्राने जो अध्यादेश जारी केला आहे, त्या मुळे बाजार समिती कायदा अस्तित्वात राहिल, मात्र बाजार समिती आवाराबाहेरील क्षेत्रात नियमनमुक्ती केली आहे. त्या मुळे बाजार समितीला बाहेरील खरेदी विक्रीवर सेस मिळणार नाही, मार्केट फी पासून वंचित राहावे लागणार आहे. 
बाजार समित्यांना शेतक-यांना मुलभूत सोयीसुविधा, वीज, पाणी, गोदाम, वजनकाटे, रस्ते अशा अनेक बाबी द्याव्या लागतात, नियमनमुक्तीनंतर उत्पन्नावर परिणाम झाल्यास या बाबी पुरविता येणार नाहीत. 

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

हा अध्यादेश शेतक-यांचे खरेच कल्याण करणारा आहे का, असा प्रश्न उपस्थित करुन त्यांच्या मालाची हमी, भाव, रक्कमेची हमी यांची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. याने बाजारसमितीसोबतच शेतक-यांचेही नुकसान होणार असल्याने या अध्यादेशाला बाजार समित्यांचा विरोध आहे. 

शुक्रवारी दिवसभर कामकाज बंद राहणार
शुक्रवारी (ता. 21) पहाटे पाच ते रात्री 12 पर्यंत कामकाज बंद राहणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market committees in the state will be closed tomorrow