दीडपट हमीभाव ग्राहकांसाठी का?

ज्ञानेश्‍वर रायते
बुधवार, 12 डिसेंबर 2018

बारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे दर किमान आधारभूत किमतीखाली आहेत. मात्र हाच शेतीमाल किरकोळ विक्रीत मात्र गगनाला भिडणारा ‘भाव’ खात आहे. त्यामुळे दीडपट हमीभाव शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी की शेतीमाल किरकोळ बाजारातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी? असाच प्रश्‍न निर्माण झाला आहे.

बारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे दर किमान आधारभूत किमतीखाली आहेत. मात्र हाच शेतीमाल किरकोळ विक्रीत मात्र गगनाला भिडणारा ‘भाव’ खात आहे. त्यामुळे दीडपट हमीभाव शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी की शेतीमाल किरकोळ बाजारातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी? असाच प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सध्याची बाजाराची तुलना करता ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना न परवडणारी सध्याची स्थिती आहे. दुष्काळाचे भांडवल खरेतर शेतकऱ्यांनी करायला हवे. मात्र हे भांडवल किरकोळ विक्रेते व व्यापारीच करत असल्याचे विचित्र चित्र सध्या बाजारपेठांमधून दिसत आहे. विशेष म्हणजे किरकोळ विक्रीत बाजारभावातील चढ-उतारानुसार बदल अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते तसे बदल होत नाहीत, चढ्या भावाने झालेल्या लिलावांनुसारच बाजारातील किरकोळ दर टिकून राहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून यंदाच्या रब्बी, खरिपात ज्वारीचे उत्पादन घटल्याने त्यांचे बाजारभाव भलतेच वाढले आहेत. शेतकऱ्यांकडील ज्वारीचे लिलाव होताना गेल्या दोन महिन्यांपासून किमान २ हजार ते कमाल ३८०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दरापर्यंत चढे दर आहेत.

ज्वारीची किमान आधारभूत किंमत २४५० रुपये प्रतिक्विंटल आहे. यातील कमाल दर अधिक दिसत असले, तरी प्रत्यक्षात लिलावाच्या वेळी खूप कमी पोत्यांना हा कमाल दर मिळतो हे वास्तव आहे. सरासरीचा विचार करता बहुसंख्य ज्वारीला किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दर मिळतो आहे. 

बाजरीला सध्या १३५१ ते १९७५ रुपयांपर्यंत दर मिळत असून, त्याची किमान आधारभूत किंमत १८३९ रुपये आहे. मक्‍याच्या बाबतीतही तशीच स्थिती आहे. मक्‍याला सध्या १४५५ ते २ हजार रुपयांपर्यंत दर आहे. मात्र त्याची किमान आधारभूत किंमत १७०० रुपये प्रतिक्विंटल आहे. गव्हाचा मात्र सध्या अपवाद आहे. किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल १८४० रुपये असलेल्या गव्हाला सध्या २ हजार ते ३७०० रुपये दर मिळत आहे. हा एकटाच अपवाद वगळला तर सूर्यफूल, तूर, हरभरा, सोयाबीन, भुईमूग या साऱ्या पिकांच्या बाबतीत आनंदी आनंद आहे.

ग्राहकांच्या वाट्याला मात्र परवडच 
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमतीच्या बाबतीत कमी दर मिळतोय ही स्थिती असतानाच दुसरीकडे या शेतीमालाचा ग्राहक असलेल्या सामान्य ग्राहकाला मात्र त्याचा फायदा होताना दिसत नाही. किरकोळ खरेदी व्यवहारात ग्राहकांना ज्वारीला प्रतिकिलो ३७ ते ५२ रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. गव्हासाठी २४ रुपयांपासून ३६ रुपयांपर्यंत, बाजरीसाठीदेखील २३ रुपयांपासून २८ रुपयांपर्यंत हरभऱ्याला ४६ ते ५२ रुपयांपर्यंत प्रतिकिलो पैसे मोजावे लागत आहेत. 

Web Title: Market Minimum Support Price Customer Farmer