आणखी २४ वस्तूंवर सेस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

पुणे, ता. २१ : पुणे हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने आणखी २४ वस्तूंवर सेस (बाजार शुल्क) आकारणी सुरू केली आहे. त्याविरोधात पणन मंत्र्यांकडे व्यापारी दाद मागणार आहेत. 

पुणे, ता. २१ : पुणे हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने आणखी २४ वस्तूंवर सेस (बाजार शुल्क) आकारणी सुरू केली आहे. त्याविरोधात पणन मंत्र्यांकडे व्यापारी दाद मागणार आहेत. 

बाजार समितीने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये २४ वस्तूंवर नव्याने सेस आकारणी सुरू केली आहे. यामध्ये भगर, जवस, मेथी, मिरची पावडर, हळद पावडर, धना, ओवा आदी वस्तूंचा समावेश आहे. सेस आकारणीसंदर्भात बाजार समितीने ठराव केला होता. त्याला जिल्हा उपनिबंधकांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार सेस आकारणीस १ जुलैपासून सुरवात झाली आहे. याविरोधात दि पूना मर्चंट्‌स चेंबरच्या सदस्यांची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यात पणन संचालक किंवा पणन मंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी यापूर्वी सेसमधून वगळलेल्या वस्तूंवर पुन्हा सेस लावण्याचा प्रकार योग्य नसल्याचे नमूद केले. 

दरम्यान, सर्वप्रकारची धान्य कमीत कमी १० किलोपर्यंत विकता येऊ शकतील. कडधान्य (५ किलो), भुईमूग (१० किलो), नारळ (२५ नग), मसाल्याचे पदार्थ (१ किलो), मिरची (१० किलो), खजूर, खोबरा गोटे, चहा, साबुदाणा, तूप यांची कमीत कमी ५ किलो इतकी विक्री करता येत आहे. बाजार आवारात किरकोळ विक्रीला काही व्यापाऱ्यांचा विरोध आहे. या पार्श्‍वभूमीवर हे परिपत्रक किरकोळ व्यापाराला प्रोत्साहन देणारे आहे, अशी टीका होत आहे. बाजारात येणाऱ्या ग्राहकाला सर्व माल या ठिकाणी मिळाला पाहिजे, असा दावा काही व्यापारी करीत आहे. उत्पादक कंपन्यांकडून कमी वजनाचे पॅकिंग बाजारात आणले जात असल्याने हा बदल केला गेल्याचा दावा केला जात आहे.

सेस आकारणी चुकीची आहे. यापूर्वी सेस नसलेल्या वस्तूंवर सेस आकारला जात आहे. प्रक्रिया केलेल्या मालावर सेस आकारू नये, असे परिपत्रक यापूर्वीच सरकारने काढले आहे.
- पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्‌स चेंबर

Web Title: market tax on 24 goods