मार्केट यार्डातील आगीत आंब्याचे लाखोंचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

बिबवेवाडी - मार्केट यार्डातील कृषी पणन मंडळातर्फे आयोजित आंबा महोत्सव मार्केटला शुक्रवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास आग लागून 63 स्टॉल पूर्णपणे खाक झाले. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी चार बंब व तीन टॅंकरच्या साह्याने पाऊण तासात ही आग आटोक्‍यात आणली. 

बिबवेवाडी - मार्केट यार्डातील कृषी पणन मंडळातर्फे आयोजित आंबा महोत्सव मार्केटला शुक्रवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास आग लागून 63 स्टॉल पूर्णपणे खाक झाले. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी चार बंब व तीन टॅंकरच्या साह्याने पाऊण तासात ही आग आटोक्‍यात आणली. 

कृषी पणन मंडळाच्या शेजारील राज्य सहकारी संघाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या आवारात आंबा उत्पादक शेतकरी ते ग्राहक योजनेंतर्गत आंबा महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये रत्नागिरी, देवगड, दापोली परिसरातील 75 शेतकऱ्यांनी 63 स्टॉलमध्ये आंबा, आंबा पल्प, लोणचे, कोकम, फणसाचे गरे यांची विक्री सुरू होती. महोत्सवाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ आंब्याच्या रिकाम्या पेट्या, गवत ठेवलेले होते. शुक्रवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास आंब्यांच्या रिकाम्या लाकडी पेट्यांना आग लागली. शेतकऱ्यांनी आग विझविण्याच्या प्रयत्न केला; परंतु ऊन व वाऱ्यामुळे आग भडकली आणि काही मिनिटांतच संपूर्ण मांडवाला आगीने वेढले. त्यामुळे शेतकरी सर्व साहित्य जागेवर सोडून बाहेर पळाले. काही शेतकऱ्यांनी आंब्याच्या पेट्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु मांडवाचे छत आगीमुळे ढासळत असल्याने त्यांना पेट्या बाहेर काढता आल्या नाहीत. 

मांडवाची आग लगतच्या वसतिगृहाच्या कॅंटीनमध्ये पोहोचली. तेथील वाचनालयातील पुस्तके, तीन संगणक, टेबल व खुर्च्या आगीत जळाल्या. 

आगीचे कारण अस्पष्ट 
मांडव बांबू व काथ्याने पत्रे बांधून केलेला होता. त्यातच छताला कापड व जमिनीवर कार्पेट टाकलेले होते, दोन स्टॉलमध्ये केवळ कापड बांधलेले होते. त्यातच आंब्याच्या रिकाम्या लाकडी पेट्या, पुठ्ठ्यांचे बॉक्‍स यामुळे आग भडकली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्याचे अग्निशामक दलाचे अधिकारी प्रकाश गोरे यांनी सांगितले. 

पणन मंडळाची बैठक 
2003 पासून कृषी पणन मंडळातर्फे उत्पादक शेतकरी ते ग्राहक या योजनेंतर्गत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा 75 शेतकऱ्यांना स्टॉल दिले आहेत. आगीत संपूर्ण स्टॉल पूर्णपणे जळाल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. पुढे आंब्याचा हंगाम सुरू राहणार असल्याने शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मार्केट उपलब्ध करण्यासाठी पणन मंडळाच्या बैठकीचे आयोजन केल्याचे कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापक जे. जे. जाधव यांनी सांगितले. 

शुक्रवारी रात्री देवगड व रत्नागिरीतून सात ट्रक आंबा आला होता. शुक्रवारी सकाळी त्याची मांडणी सुरू असतानाच मागील प्रवेशद्वाराजवळ आग लागल्याचे कळाले. आग विझविण्यासाठी अग्निरोधक यंत्राचा वापर केला; परंतु आग भडकल्यामुळे आम्हाला बाहेर पळावे लागले. लाखो रुपयांचा माल आणि काही रोकड डोळ्यांदेखत खाक झाली. पुढे येणाऱ्या मालाच्या विक्रीची चिंता लागली आहे. 
धीरज भाने, स्टॉलधारक शेतकरी 

यंदा प्रथमच महोत्सवात आंबा विक्रीला आलो होतो. आगीत आंबा, आंबा पल्प, फणसाचे गरे, लोणचे आगीत पूर्ण खाक झाले. पुढे येणारा आंबा कोठे विकायचा हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पणन मंडळाने नुकसान व पुढील विक्रीचे नियोजन करून स्टॉलधारकांना मदत करावी. 
शोएब इनामदार, स्टॉलधारक शेतकरी 

अग्निशामक दलाची इमारत पडून 
मार्केट यार्ड परिसरात एक महिन्याच्या कालावधीत तीन मोठ्या आगीच्या घटना घडल्या असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, बिबवेवाडी परिसरात अग्निशामक दलाचे केंद्र नसल्यामुळे वेळेत मदत पोचत नाही. मदत पोचेपर्यंत आग भडकलेली असते. मार्केट यार्डालगत गंगाधाम चौकात अग्निशामक केंद्र उभारलेले असून, काही मिनिटांत मदत पोहोचू शकते; परंतु प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभारात अग्निशामक केंद्रांची इमारत तशीच पडून आहे. 

नागरिक मारण्यासाठी धावले 
अग्निशामक दलाचे जवान आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत असताना जेसीबीच्या साह्याने पत्रे काढत होते. त्या वेळी काही नागरिक मारण्यासाठी अंगावर धावून आल्याचे जवानांनी सांगितले. मागील आठवड्यात आंबेडकरनगर आगीच्या घटनेवेळीही अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाली होती.

Web Title: Market yard fire millions of mangoes lost