कौतुकास्पद! एचआयव्हीबाधित व्यक्तींना मिळणार जोडीदार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्‍चरर्स लिमिटेड, चाकणचे यश फाउंडेशन, नेटवर्क ऑफ पॉझिटिव्ह पीपल, चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एचआयव्ही, एनएमपी प्लस पुणे, विहान प्रकल्प मालेगाव आणि प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट यांच्यातर्फे दोन वर्षांपासून मंगल मैत्री मेळावा आयोजित केला जात आहे. त्यास विवाहेच्छुक वधू-वरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. मेळावा निःशुल्क असल्याचे यश फाउंडेशनचे वैभव पवार यांनी सांगितले. 

पिंपरी : एचआयव्हीबाधित व्यक्तींना सन्मानाने जगता यावे, आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यात निर्माण व्हावा आणि सुखी, समृद्ध व आनंदी जीवन त्यांना जगता यावे, या उद्देशाने प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी (ता. 25) सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मंगलमैत्री मेळावा आयोजित केला आहे. 

महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्‍चरर्स लिमिटेड, चाकणचे यश फाउंडेशन, नेटवर्क ऑफ पॉझिटिव्ह पीपल, चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एचआयव्ही, एनएमपी प्लस पुणे, विहान प्रकल्प मालेगाव आणि प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट यांच्यातर्फे दोन वर्षांपासून मंगल मैत्री मेळावा आयोजित केला जात आहे. त्यास विवाहेच्छुक वधू-वरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. मेळावा निःशुल्क असल्याचे यश फाउंडेशनचे वैभव पवार यांनी सांगितले. 

गेल्या दोन वर्षांत चाकण व खेड परिसरातील सहा आणि राज्यातील 46 जोडप्यांचे विवाह या मेळाव्याच्या माध्यमातून झाले आहेत. नावनोंदणी आवश्‍यक मेळाव्यासाठी नावनोंदणी आवश्‍यक आहे. त्यासाठी जन्म दाखला, वयाचा दाखला, एआरटी पुस्तकाची झेरॉक्‍स, एचआयव्हीचा पहिला रिपोर्ट, घटस्फोटित असल्यास पुरावा, साथीदाराचा मृत्यू झालेला असल्यास मृत्यू दाखला सादर करावा. विवाह जुळविण्याची पद्धत मेळाव्यात सर्वप्रथम विवाहेच्छुकांची ओळख करून दिली जाते. एकमेकांच्या पसंतीनंतर त्यांच्या कुटुंबीयांची बैठक घेतली जाते. त्यांच्याशी चर्चा करून विवाहपूर्व समुपदेशन केले जाते. त्यानंतर विवाह केला जातो. तसेच, त्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला जातो. 

कार्यक्रमाची रूपरेषा 
एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना रोजगार निर्मितीसाठी व्यावसायिक प्रशिक्षण व सरकारी योजनांची माहिती दिली जाईल. त्यांना तज्ज्ञ डॉक्‍टर मार्गदर्शन करतील. आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, एआरटी औषधांचे सातत्य व त्यांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage gathering for HIV-infected person