लग्नाच्या हजेरीसाठी पुढाऱ्यांची दमछाक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

तळेगाव स्टेशन - घटलेल्या लग्नतिथीमुळे यंदा उन्हाळ्यात विवाह मुहूर्त कमी असल्याने वैशाख वणव्याच्या कडक उन्हात एकाच दिवशी विविध ठिकाणच्या विवाह समारंभांना हजेरी लावण्यासाठी पुढाऱ्यांची दमछाक होत आहे. 

तळेगाव स्टेशन - घटलेल्या लग्नतिथीमुळे यंदा उन्हाळ्यात विवाह मुहूर्त कमी असल्याने वैशाख वणव्याच्या कडक उन्हात एकाच दिवशी विविध ठिकाणच्या विवाह समारंभांना हजेरी लावण्यासाठी पुढाऱ्यांची दमछाक होत आहे. 

अधिक मास त्यातच चंद्रबल आणि गुरुबलाच्या अस्तयोगामुळे लग्नतिथी घटल्याने एप्रिल आणि मेमध्ये बोटावर मोजण्याएवढेच लग्नमुहूर्त आहेत. दिवसभरात किमान १५ ते २० विवाह, साखरपुड्याला हजर राहण्याचे नियोजन करूनही वेळेचे गणित चुकत आहे. कधी जेवणावळी, विधी अथवा पाठवणीपर्यंत कसेबसे पोचण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागत आहे. मावळ तालुक्‍याची भौगोलिक परिस्थिती पाहता, महामार्गाकडेच्या मंगल कार्यालयांतील लग्नाला उपस्थित राहणे सोपे असले, तरी आडमार्गी दुर्गम भागात वेळेवर पोचणे अशक्‍य होते. त्यामुळे अनेकजण सौभाग्यवती अथवा आपल्या चिरंजीवांना पाठवून समाधान करत आहेत. 

काहीजण सोशल मीडियाचा आधार घेत मोबाईलवरूनही शुभेच्छा देत आहेत; तर काही ठिकाणी कसेबसे धावत-पळत विवाहस्थळी पोचत आहेत.

निवडणुकीची पार्श्‍वभूमी
निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असल्याने लग्नसराईत कधी मतदारांची मनधरणी; तर कधी कार्यकर्त्यांचा हट्टामुळे नेत्यांना लग्नसोहळ्यांना उपस्थिती दाखवावी लागते. ठळक अक्षरात प्रमुख उपस्थितीत नाव छापलेली पत्रिका घेऊन कार्यकर्ते थेट निमंत्रणासाठी भेटतात. त्यांचा हिरमोड नको म्हणून त्यांना हसून हो म्हणावेच लागते.

Web Title: marriage presenty leader muhurt