तीनशे रुपयांच्या लग्नासाठी लागतात तीन हजार! 

सोमवार, 28 मे 2018

पुणे - विवाह अधिकारी आणि निबंधक कार्यालयात लग्न करायचे असेल, तर कायदेशीर खर्च फक्त 300 रुपये आहे; पण एजंटांच्या विळख्यात सापडलात, तर तुम्हाला तब्बल तीन हजार रुपये मोजावे लागतात. एजंटांशिवाय विवाहाची प्रक्रिया पूर्ण करायची असेल, तर संबंधित दांपत्याला मनस्तापालाच सामोरे जावे लागण्याची शक्‍यता अधिक! 

पुणे - विवाह अधिकारी आणि निबंधक कार्यालयात लग्न करायचे असेल, तर कायदेशीर खर्च फक्त 300 रुपये आहे; पण एजंटांच्या विळख्यात सापडलात, तर तुम्हाला तब्बल तीन हजार रुपये मोजावे लागतात. एजंटांशिवाय विवाहाची प्रक्रिया पूर्ण करायची असेल, तर संबंधित दांपत्याला मनस्तापालाच सामोरे जावे लागण्याची शक्‍यता अधिक! 

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातही विवाह नोंदणी करता येते; पण नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठीचे संपूर्ण जिल्ह्यासाठी हे एकमेव ठिकाण असल्याने येथे गर्दी खूप असते. दिवसातून 15-20 जोडपी या कार्यालयात नोंदणी विवाहासाठी येतात. विवाह करण्यासाठी चौकशीला येणाऱ्या दांपत्यांवर एजंटांची उडी पडते. प्राथमिक कागदपत्रांची माहिती दिल्यावर "दक्षिणा' सांगितली जाते. काही दांपत्यांना घरच्यांच्या अपरोक्ष लग्न करायचे असते. त्यामुळे नोटीस घरी येऊ नये, अशी त्यांची इच्छा असते. आणखी "दक्षिणा' मोजली की ते कामही फत्ते होते; परंतु एखाद्या दांपत्याने एजंटांशिवाय विवाह करायचे ठरविले, तर त्यांच्या कागदपत्रांत अनेक त्रुटी निघतात अन्‌ त्यांना हेलपाटे मारावे लागतात. परंतु तीच कागदपत्रे एजंटाने पुढे सरकविली, तर शासकीय सोपस्कार तत्परतेने पूर्ण केले जातात. 

लग्नासाठी मोफत मिळणारा फॉर्मही बाहेर झेरॉक्‍सच्या दुकानात दहा रुपये देऊन घ्यावा लागतो. कार्यालयात चक्कर मारली तर एजंटांचा मुक्त वावर, शासकीय कागदपत्रे हाताळण्यातील त्यांची सहजता नागरिकांना अचंबित करते. "तीनशे रुपयांच्या कामासाठी तीन हजार रुपये कशासाठी', असे नागरिकांनी एजंटाला विचारल्यावर ते बोट दाखवितात अधिकाऱ्यांकडे. तेव्हा "या शासकीय कार्यालयाशी आवारातील एजंटांचा काहीही संबंध नाही', अशी पाटी शोभेची ठरते..... 

नोंदणी पद्धतीने विवाह करण्याची प्रक्रिया 

- www.igrmaharashta.gov.in या संकेतस्थळावर जा 
- आपला जिल्हा आणि विवाह नोंदणी कार्यालय निवडून सर्व तपशील भरा 
- आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करा 
- ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या फॉर्मची प्रत काढून, त्यासोबत वधू-वराचा जन्म दाखला, रहिवासी दाखला आणि तीन साक्षीदारांचे आधार कार्ड अशी कागदपत्रे कार्यालयात दाखल करावीत. 
- एका महिन्यानंतर पुढील साठ दिवसांत कधीही येऊन विवाह करता येऊ शकतो. 

Web Title: Marriage Registration Office legal cost is only Rs. 300 but agents pay Rs 3,000