पावसाळा अर्धा संपला तरी मस्तानी तलाव ३०-४० टक्केच । pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळा अर्धा संपला तरी मस्तानी तलाव ३०-४० टक्केच

पावसाळा अर्धा संपला तरी मस्तानी तलाव ३०-४० टक्केच

उंड्री-पिसोळी: निसर्ग सौंदर्याच्या खाणीत दिवेघाटाच्या डोंगरपायथ्याला असलेल्या ऐतिहासिक पेशवेकालीन मस्तानी तलावाची पुरातत्त्व खात्याच्या उदासीनतेमुळे दूरवस्था झाली आहे. अर्ध्याहून अधिक पावसाळा संपला तरी अद्याप ३०-४० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला. हिरवागार शालू नेसलेली धरणी आणि तलावातील निळेशार पाण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. मात्र, पाण्याने भरलेला तलाव पाहण्याची मजा मिळत नसल्याने पर्यटकांनीबरोबर स्थानिकांनीही नाराजी व्यक्त केली.

दिवे घाटातून वाहून येणारे पाणी रस्त्याच्या बाजूने चर काढून दिल्याने थेट ओढ्यात जाते. रस्तारुंदीकरण करताना मस्तानी तलावाकडे जाणारे पाईप बंद केले आहेत, त्यामुळे मागिल काही वर्षांपासून तलावात पावसाचे पाणी कमी येत आहे. नेमिची येतो पावसाळा तशा दर पाच वर्षांनी लोकसभा आणि विधान सभा निवडणुका येतात, त्यावेळी मस्तानी तलावाचे पर्यटन करून विकास करण्याचा मुद्दा ऐरणीवर येतो. मात्र, निवडणुका संपल्या की पुन्हा त्या घोषणा हवेत विरून जातात. त्यामुळे पुणे शहरालगत असलेला ऐतिहासिक वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

हडपसर-सासवड पालखी मार्गावर वडकीनाला येथून दिवेघाटातील नागमोडी वळणाची वाट सुरू होते. दिवे घाटाच्या पायथ्याशी डोंगर कुशीत निसर्गाच्या सानिध्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पेशवेकालीन ऐतिहासिक तलाव अद्याप अर्धासुद्धा पाण्याने भरला नाही. त्यामुळे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असलेल्या पर्यटकांची घोर निराशा होत आहे. यावर्षी अद्याप पावसाने मोठी हजेरी लावली नाही. त्यातच प्रशासनाच्या उदासीन वृत्तीमुळे डोंगरावरून वाहत येणारे पावसाचे पाणी अडवून तलावात सोडावे अशी काहीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे दरवर्षी तलावात साठणारे पाणी कमी कमी होऊ लागले आहे.

महापराक्रमी शूरवीर बाजीराव पेशवे व अद्वितीय सौंदर्यवती मस्तानी यांच्या प्रेमाची साक्ष देणारा मस्तानी तलावाची पुरातत्व खाते व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पडझड होताना पाहून दुःख होत असल्याची भावना पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे. दगडी बांधकामाचा चिरेबंदी तलावाच्या संरक्षक भिंती ढासळू लागल्या आहेत. तलावाच्या बाजूला आणि तलावामध्ये झाडी-झुडपी उगवली आहेत. तटबंदी ढासळत आहे, तलावात गाळ साचला आहे. डोंगरावरील दगडगोटे, माती तलावात वाहून येत असल्याने तलाव बुजू लागला आहे. तलावात पाणी सोडण्यासाठी वडकीकरांनी अनेकदा मागणी करुनसुध्दा प्रशासनाकडून कोणतीही योजना राबविली जात नाही, हे दुर्दैव आहे. या तलावाच्या देखभालीसाठी व्यवस्था नाही, कोणाचेही नियंत्रण नाही, अशी अवस्था मस्तानी तलावाची झाली आहे.

"मस्तानी तलावाचे पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या राज्यकर्त्यांकडून वारंवार पाहणी करून घोषणाबाजी केले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही. मस्तानी तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाला, तर बोटिंग, हॉटेलिंग असे व्यवसाय सुरू होऊन रोजगार निर्मिती होईल आणि परिसराचा विकास होण्यास मदत होईल. तसेच, ऐतिहासिक वारसा कायमचा जतन होईल. प्रशासनाने मस्तानी तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित केला पाहिजे."- सागर मोडक, ग्रामस्थ, वडकी

"वडकीकरांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मस्तानी तलाव वरदान ठरला आहे. मात्र, यावर्षी अद्याप तलावात अर्धाहूनही कमी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यावर्षी पाणी समस्या भासणार आहे. त्यामुळे प्रशासनाने डोंगरमाथ्यावरून वाहून येणारे पाणी तलावात आणण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे."-दिलीप गायकवाड, ग्रामस्थ, वडकी

टॅग्स :Pune Newsrainmansoon